Vehicle Sales : घाऊक प्रवासी वाहन विक्री विक्रमी पातळीवर; एप्रिल महिन्यात 3,35,629 युनिटची विक्री

Wholesale Passenger Vehicle Sales – सध्या व्याजदर जास्त असूनही भारतीय ग्राहकाकडून वाहन खरेदी चालूच आहे. एप्रिल महिन्यामध्ये घाऊक प्रवासी वाहन विक्री म्हणजे कंपन्यांनी वितरकांना विकलेल्या वाहनांची संख्या 1.3 टक्क्यांनी वाढून 3,35,629 युनिट या विक्रमी पातळीवर गेली असल्याचे वाहन निर्मात्या कंपन्यांच्या संघटनेने सांगितले.
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मनुफॅक्चरर्स या संघटनेचे अध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी सांगितले की, नवीन आर्थिक वर्ष आशादायक पद्धतीने सुरू झाले आहे. व्यावसायिक वाहनाबरोबरच दुचाकी, तीन चाकी आणि प्रवासी वाहनांची विक्री एप्रिल महिन्यात वाढली आहे. आगामी काळातही ही विक्री वाढत राहील याबद्दल आम्ही आशावादी आहोत.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात 3,31,278 प्रवासी वाहने विकली गेली होती. एप्रिल महिन्यात दुचाकीची विक्री तब्बल 31 टक्क्यांनी वाढून 17,51,393 युनिट इतकी झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये केवळ 13,38,588 दुचाकी वाहनांची विक्री झाली होती. गेल्या काही वर्षापासून दुचाकीची विक्री कमी झाली होती. त्यामुळे उत्पादक आणि वितरक नाराज झाले होते. मात्र आता दुचाकीची विक्री वाढत असल्याचे दिसून येत आहे. याचा अर्थ शहरातील नागरिकांचे उत्पन्न वाढत आहेे. त्याचबरोबर लग्नसराईमुळेही दुचाकीचे विक्री वाढण्यास मदत होत असल्याचे दिसून येते.
एप्रिल महिन्यात स्कूटरची विक्री 25 टक्क्यांनी वाढून 5,81,277 युनिट इतकी झाली आहे. जी की गेल्या वर्षी 4,64,389 एवढी होती. एप्रिल महिन्यात तीन चाकी वाहनाचे विक्री 14.5% ने वाढून 49,116 युनिट झाली आहे. जी की गेल्या वर्षी या महिन्यात 42,885 युनिट होती.
पाऊस पडल्यावर विक्री वाढेल
गेल्या वर्षी देशभरात विषम प्रमाणात पाऊस पडला होता. त्यामुळे विविध क्षेत्रावर परिणाम झाला होता. मात्र तरीही वाहन क्षेत्रावर याचा फारसा परिणाम झालेला नाही. आता पाऊस चांगला पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जर पाऊस चांगला पडला तर दुचाकीसह सर्वच वाहनांची विक्री वाढण्यास मदत होईल, असे वाहन वितरकांच्या संघटनेला वाटते. त्या दृष्टिकोनातून वितरक आणि उत्पादन तयारी करीत असल्याचे वातावरण आहे.


