‘आपटून-आपटून कुणाला मारणार?’; मराठी महिला खासदारांचा सवाल अन् दुबेंनी घेतला काढता पाय

Nishikant Dubey | महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. याच दरम्यान भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी ‘तुमच्यात हिंमत असेल तर महाराष्ट्राबाहेर या, तुम्हाला आपटून आपटून मारु,’ असं वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. राज ठाकरेंनी आपल्या सभेतून दुबेंना इशारा दिला होता.
त्यानंतर आता मराठी माणसाला आपटून आपटून मारण्याची भाषा करणाऱ्या भाजपच्या निशिकांत दुबे यांना राज्यातील महिला खासदारांनी पळताभुई सोडल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी संसदेचे कामकाज संपल्यानंतर लॉबीमध्ये दुबे दिसताच महिला खासदारांनी त्यांना जाब विचारला. इतकेच काय तर त्यांच्यापुढे ‘जय महाराष्ट्र’ अशा घोषणा दिल्या.
नेमकं काय घडलं?
काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकर यांनी भाजप खासदार दुबे यांना बुधवारी संसेदत गाठलं. दुबेंना तिघींनी घेराव घातला आणि मराठीबाबतच्या विधानांबाबत जाब विचारला. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी दुबे यांना जाब विचारत म्हटले की, “मराठी लोकांना मारण्याची भाषा तुम्ही कशी करू शकता? आपटून आपटून तुम्ही कुणाला मारणार आहात? ही कसली तुमची अर्वाच्च भाषा? तुमचे वागणे-बोलणे योग्य नाही. मराठी माणसाबद्दलची अरेरावी खपवून घेतली जाणार नाही.”
त्यावर आप तो मेरी बहन है, असं म्हणत दुबे हात जोडून तिकडून निघून गेले. महाराष्ट्राच्या महिला खासदारांचा रोष पाहून दुबेंनी संसदेतून काहीही उत्तर न देता काढता पाय घेतल्याचे पाहायला मिळाले. मराठीच्या मुद्द्यावरून विधान केल्याने दुबेंची झालेली अडचण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. Nishikant Dubey |
राज ठाकरे यांचे प्रत्युत्तर
निशिकांत दुबेंच्या विधानावरुन राज ठाकरेंनी आव्हान दिलं. ‘दुबे नावाचा कोणीतरी भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणाला, मराठी लोकांना आम्ही पटकून पटकून मारु…. तू आम्हाला पटक पटकके मारणार? दुबेला मी सांगतो, दुबे… तुम मुंबई में आ जावो, मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे…,’असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना प्रत्युत्तर दिलं.
हेही वाचा :





