Satara News| वाई मतदारसंघात कोण बाजी मारणार ?

वाई, – वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेसाठी निवडणूक प्रक्रिया उत्साहात पार पडल्यानंतर मतमोजणीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झालेली असताना दिसत आहे. राजकीय कार्यकर्त्यांमध्ये कोण निवडून येणार याविषयी चर्चांना उधाण आले आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा आपला नेता निवडून येणार यावर ठाम आहे. वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेची निवडणूक विकास कामांच्या मुद्द्यावरून एकतर्फी होईल, अशी आशा असताना शरद पवार यांनी केलेल्या खेळीमुळे ती चुरशीची झाल्याचे दिसत आहे.
वाई विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया मोठ्या उत्साहात पार पडली. नागरिकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला, आणि सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६८.५७ टक्के मतदान झाले. मागील पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा यावर्षी जास्त मतदान झालेले आहे.
वाई विधानसभेसाठी ४७१ मतदान केंद्रवरती मतदान संपन्न झाले. रात्री उशिरापर्यंत मतपेट्या आणण्याचे काम सुरू होते. वाई औद्योगिक वसाहतीमधील वखार महामंडळाच्या इमारतीमध्ये या मतदारसंघातील मतपेठ्या ठेवण्यात आल्या आहेत. मतदान झाल्यानंतर सर्व शासकीय यंत्रणा औद्योगिक वसाहतीमध्ये ठाण मांडून आहे. वाई खंडाळा महाबळेश्वर हा मतदार संघ भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्यामुळे मतदार संघातील कानाकोपऱ्यातील गावातील मतपेठ्या आणण्यासाठी सरकारी यंत्रणेची धावपळ उडाली आहे. शनिवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी पूर्वतयारी करण्यामध्ये शासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे.
यंदाच्या निवडणुकीमध्ये लोकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ झालेली दिसत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे हे दुर्गम भागातील मतदान केंद्रावर वेब कास्टिंग यंत्रणेद्वारे लक्ष ठेऊन होते. दुर्गम भागातील मतपेट्या लवकरात लवकर औद्योगिक वसाहतीमधील वखार महामंडळामध्ये पोचतील यासाठी शासकीय यंत्रणा पूर्ण तयारीमध्ये होते. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडल्यानंतर पोलिस प्रशासनाकडून मतमोजणीसाठी चोख बंदोबस्त कशा पद्धतीने राखता येईल यावर काम करत असताना दिसत आहे.
जास्त मतदानाचा फायदा कोणाला ?
या मतदारसंघाची मतमोजणी औद्योगिक वसाहती मधील वखार महामंडळ येथे करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदान झाल्यानंतर औद्योगिक वसाहत ही सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणेची छावणी बनली आहे. मतदारांच्या दृष्टीने पाहता प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्याच नेत्याचा विजय होईल आशा चर्चांना उधाण आले आहे. हॉटेल्स, बाजारपेठ, ऑफिसेस, पानपट्टी अशा स्थानिक गर्दीच्या ठिकाणी कोण मताधिक्य घेणार या चर्चा सुरु आहेत. मागील विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत झालेल्या मतदानापेक्षा जास्त मतदान यंदाच्या निवडणुकीत झाल्याने याचा फायदा कोणाला होईल यावरती चर्चा सुरू आहेत.





