वडगाव मावळ, (वार्ताहर) – मावळ तालुक्यातून जाणाऱ्या जुन्या मुंबई-पुणे महामार्गा लगतच्या साईड पट्ट्यांची दयनीय अवस्था झाली असून त्यामुळे छोटे-मोठे अपघातांची संख्या वाढली आहे. एकीकडे टोलनाक्यांची दुरूस्ती करून तिथे टोल वसूली सुरू ठेवणाऱ्या कंपनी अधिकाऱ्यांचे या गंभीर गोष्टीकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे. वडगाव ते कामशेतपर्यंत सर्वाधिक दुरावस्था – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ हा मावळच्या मध्यातून जातो. महामार्गावर तालुक्यातील लोणावळा, कामशेत, वडगाव, तळेगाव आदी महत्वाची ठिकाणे आहेत. दरम्यान वडगाव ते कामशेत येथे महामार्गावरील साईड पट्ट्या काही ठिकाणी खचल्या आहेत, तर काही भागात मोठ्या प्रमाणावर खडी साचलेली दिसते. त्यामुळे येथून दुचाकी चालकांची वाहने घसरण्याची किंवा खडीत रूतण्याचे प्रकार घडतात. आजवर यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. आयआरबी कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता त्यांनी, आता किती जरी साईड पट्ट्या खराब झाल्या असल्या तरीही त्या लगेच दुरूस्त करता येणार नाही. आम्ही दरवर्षी साधारणत: ऑक्टोबर महिन्यानंतर साईड पट्ट्यांची डागडुजी करतो. परंतु सध्या महामार्गावर वाळू, खडी, दगड आदींची वाहतूक करणारी वाहने क्षमतेपेक्षा अधिक माल वाहनात भरून वाहतूक करतात. त्यामुळे अशा वाहनांतून महामार्गावर ठिकठिकाणी खडी, दगड, वाळू आदी सांडत आहे. यामुळे महामार्गावर आणि साईड पट्ट्यावर राडारोडा होत असल्याने अशा वाहन चालकांनीच याबद्दल काळजी घेणे गरजेचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आता रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा देखील आयआरबी कंपनीवर अंकूश राहिला नसल्याने महामार्गावरील खडी नेमकी कोण आणि कधी उचलणार? सामान्यांची या त्रासातून सुटका कशी होणार? असे प्रश्न मावळच्या सामान्य नागरिकांना आणि दररोज ये-जा करणऱ्या प्रवाशांना पडले आहेत.