नवी दिल्ली :- टी-20 विश्वकरंडकानंतर आम्ही रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) अंतिम फेरी जिंकू, असा निर्धार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे(बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी व्यक्त केला आहे.
शहा यांनी टी-20 विश्वकरंडक जिंकल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन करणारा व्हिडिओ जारी केला. ते म्हणाले की, मी राजकोटमध्ये सांगितले होते की, जून 2024 मध्ये आम्ही मने जिंकू आणि करंडक देखील. त्याप्रमाणे बार्बाडोसमध्ये आम्ही भारतीय तिरंगा रोवला आहे. या विजयात शेवटच्या पाच षटकांचा मोठा वाटा होता. या योगदानाबद्दल मी सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या यांचे आभार मानू इच्छितो. या विजयानंतर पुढील ध्येय डब्ल्यूटीसी फायनल आणि चॅम्पियन्स ट्रॉफी असेल.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना 19 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. 9 मार्च रोजी अंतिम सामना होणार आहे. त्याच वेळी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा अंतिम सामना जूनमध्ये लंडनमधील लॉर्ड्स येथे खेळवला जाईल.
विश्वकरंडक द्रविड, रोहित, कोहली व जडेजाला समर्पित…
शहा पुढे म्हणाले की, टी-20 विश्वकरंडकाचा विजय मला प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना समर्पित करायचा आहे. गेल्या वर्षभरातील आमची ही तिसरी फायनल होती. जून 2023 मध्ये, आम्ही जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत हरलो. नोव्हेंबर 2023 मध्ये दहा विजयानंतर आम्ही मन जिंकले, पण करंडक जिंकू शकलो नाही.