पुणे जिल्हा | मिनी विधानसभेची तळतळ कोणाला भोवणार?

राहू (वार्ताहर) – सध्या लोकसभेनंतर विधानसभेचे वारे वाहू लागले आहे; परंतु जिल्हा परिषद व पंचायत समिती (मिनी विधानसभा)च्या निवडणुकांचा कोणी विचारच करायला तयार नाही की या निवडणुका मुद्दाम होऊ दिल्या जात नाही, असा प्रश्न इच्छुकांना पडला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा कालावधी संपून अनेक दिवस झाले आहेत; परंतु या न त्या कारणाने या निवडणुका आजपर्यंत पुढे ढकलल्या गेल्या आहेत. खरच तशी परिस्थिती आहे,की यामध्ये काही राजकीय गणिते आहेत हे देखील नागरिकांना समजेनासे झाले आहे.
परंतु या सगळ्या घोळामुळे इच्छुक मात्र मेटाकुटीला आहे आहेत. आज घडीला 26 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समित्या अस्तित्वात आहेत.
तरी अजून निवडणुकांचा काही निर्णय झालेला नाही. एवढा कालावधी म्हणजे खूप मोठा कालावधी आहे. जवळजवळ अडीच वर्षे गेलेली आहेत. याला जवाबदारी कोण? आयोग, सरकार की आरक्षण? वरील कारणांबरोबर इतर ही अनेक कारणे आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समित्या या नागरिकांच्या रोजच्या व्यवहाराशी संबंधित असतात, त्यामुळे या संस्था जिवंत ठेवणे गरजेचे असते; परंतु राजकीय बट्ट्याबोळामुळे या संस्थांचे अस्तित्वच संपण्याच्या मार्गावर आहे.
वरील पैकी कोणतेही कारण आसले तरी अडचण होते ती इच्छुक कार्यकर्त्यांची. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कालावधी संपण्याच्या अगोदर दोनवर्षांपासून अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केलेली आहे.
म्हणजे साधारणपणे गेली पाच वर्षे हे इच्छुक तयारी करत आहेत ज्या नेत्याच्या मागे पुढे करून जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य होण्यासाठी तिकीट मिळविण्यासाठी पैसा खर्च केला,
नेत्याचा प्रचार केला, कार्यकर्ते सांभाळले त्या नेत्याची विधानसभेची दुसरी टर्म येण्याची वेळ झाली तरी इच्छुक हे इच्छुकच राहिले. ही वस्तुस्थिती भयंकर आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे.
युतीला फटक्याची शक्यता तर आघाडी सेफ झोनमध्ये याचा सर्वात जास्त फटका हा युतीला बसू शकतो. कारण काही काळ सोडला तर 2014 पासून महायुती ही कायम सत्तेत आहे.
यामुळे अर्थातच सरकार विरोधात रोष वाढत आहे. तसेच वरिष्ठ पातळीवर सत्ता मिळविण्यासाठी जी काही तत्व सोडून केविलवाणी धडपड राज्य पातळीवरील नेते करत आहेत.
त्यामुळे आमचा विचारच करायला यांना वेळ नाही हे. फक्त आपलेच पाहत आहेत. यामुळे देखील विद्यमान सरकार विरोधात मोठी नाराजी दिसून येत असून भावनिक लाटेमुळे महाविकास आघाडी सेफ झोनमध्ये असल्याचे सध्याचे चित्र आहे.
दुधाची तहान ताकावर
जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी अनेक जण इच्छुक होते; परंतु जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा काही मेळ लागण्या सारखा दिसना म्हणून काहींनी पर्याय म्हणून मध्यतरी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये आपले वजन वापरुन सहकारात का होइना, तालुका पातळीवरील नेता होण्याची आपली इच्छा पूर्ण करून दुधाची तहान ताकावर भागवली आहे.





