Prithviraj Chavan: “कोणाला निवडणुका जिंकण्यास मदत करत होते?”; पृथ्वीराज चव्हाणांची ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी
Prithviraj Chavan: 'निवडणूक आयोगाच्या कामकाजाची चौकशी करा'

Prithviraj Chavan: निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत प्रसिद्ध केलेला अहवाल धक्कादायक आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची प्रक्रिया सुरु करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार हे सहकारी आयुक्तांशी चर्चा न करता आयोगाच्या वतीने निर्णय घेत होते, परंतु या आरोपांचे अद्याप कोणाकडूनही खंडन झालेले नाही, असा दावा त्यांनी केला आहे. मतभेद असू शकतात, मात्र कायद्यानुसार निर्णय एकमताने किंवा बहुमताने सामूहिकरीत्या घेतले जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या सगळ्यामुळे ते कोणाला निवडणुका जिंकण्यास मदत करत होते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मोदी सरकारवर झालेला हा सर्वात गंभीर आरोप
गेल्या १२ वर्षांत मोदी सरकारवर झालेला हा सर्वात गंभीर आरोप आहे. राज्यघटनेत नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्यासाठी विरोधी पक्षाने महाभियोगाचा प्रस्ताव मांडावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच आवश्यक असल्यास सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेऊन निवडणूक आयोगाच्या कामकाजाची चौकशी करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली.
निवडणुका मॅनेज केल्या तर लोकशाहीला काही अर्थच नाही, असे नमूद करत पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, निवडणूक आयोग ही संविधानाच्या कलम 324 अन्वये स्थापन झालेली घटनात्मक संस्था असून 1995 मधील ‘टी.एन. शेषन विरुद्ध भारत सरकार’ या ऐतिहासिक खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये निवडणूक आयुक्तांचे अधिकार आणि भूमिका स्पष्टपणे निश्चित करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा:






