Laughing boy arun : हातात चहाचा कप, चेहऱ्यावर जबरदस्त स्माईल.! प्रत्येक मीम्स मधला हा चेहरा नेमका कुणाचा? ट्रकमध्ये शिकून झाला दहावी पास
अरुणसाठी हा केवळ परीक्षेतील विजय नाही, तर त्याचं हरवलेलं बालपण आणि अपूर्ण राहिलेलं स्वप्न पुन्हा जगण्याची संधी आहे. एका ट्रक ड्रायव्हरने दाखवलेल्या विश्वासामुळे आणि मदतीमुळे त्याला आयुष्याची नवी वाट मिळाली.

Laughing boy arun : कधी काळी पोटाची खळगी भरण्यासाठी शाळा सोडावी लागली, तर कधी ट्रकच्या केबिनमध्ये क्लीनर म्हणून दिवस काढावे लागले… पण चेहऱ्यावरचं हसू मात्र कधीच हरवलं नाही! सोशल मीडियावर आपल्या निरागस हास्याने लाखो लोकांची मनं जिंकणारा ‘लाफिंग बॉय’ अरुण कुमार आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (Laughing boy arun)
त्याच्या हसण्याचा व्हिडीओ पाहून लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं होतं. मात्र, त्याच्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी फार कमी लोकांना माहीत होती. विशेष म्हणजे, ज्या मुलाचं शिक्षण गरिबीमुळे चौथीतच थांबलं होतं, त्याच अरुणने आता दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. एका ट्रक ड्रायव्हरने दाखवलेली माणुसकी आणि शिक्षणासाठी घेतलेली मेहनत यामुळे अरुणच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली आहे. (Laughing boy arun)
सोशल मीडियावर एखादा व्हिडीओ व्हायरल झाला की, त्यातील व्यक्ती रातोरात प्रसिद्धीच्या झोतात येते. अनेकदा अशा व्हिडीओमधील व्यक्तींची ओळख केवळ त्यांच्या एका कृतीपुरती मर्यादित राहते.
मात्र, अरुण कुमारची गोष्ट यापेक्षा वेगळी आहे. आपल्या खळखळून हसण्यामुळे प्रसिद्ध झालेल्या अरुणला आज ‘लाफिंग बॉय’ म्हणून ओळखलं जातं. त्याच्या हसण्याने लाखो लोकांचं मनोरंजन केलं; पण या हसऱ्या चेहऱ्यामागे संघर्षाचं मोठं वास्तव दडलं होतं.
गरिबीमुळे वयाच्या दहाव्या वर्षी सोडावी लागली शाळा (Laughing boy arun)
रिपोर्ट्सनुसार, अरुण कुमार याचं बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेलं. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्याला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं.
चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याने काम करण्यास सुरुवात केली. पुढे तो नेहरू नावाच्या एका ट्रक ड्रायव्हरसोबत क्लीनर म्हणून काम करू लागला. ट्रकमधील सामानाची ने-आण, लांबचा प्रवास आणि रोजचा संघर्ष यातच त्याचं बालपण हरवून गेलं.
एका चहाच्या टपरीवरील व्हिडीओने बनवलं इंटरनेट सेन्सेशन
ट्रकने प्रवास करत असताना एक दिवस चहाच्या दुकानावर थांबले असताना नेहरू यांनी अरुणचा हसतानाचा व्हिडीओ शूट केला. अरुणचं निरागस आणि मनमोकळं हसू कॅमेऱ्यात कैद झालं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर काही वेळातच प्रचंड व्हायरल झाला. पाहता पाहता लाखो लोकांनी त्याचा व्हिडीओ पाहिला आणि अरुण इंटरनेटवर लोकप्रिय झाला.
लोक त्याच्या हसण्याचे मीम्स बनवू लागले. अनेकांनी त्याच्या हास्याची नक्कल केली, तर काहींनी त्याला सोशल मीडियावर भरभरून प्रेम दिलं. मात्र, या प्रसिद्धीच्या झगमगाटात एक गोष्ट दुर्लक्षित राहिली होती. अरुणला लोक काय लिहित आहेत, त्याच्या व्हिडीओवर किती प्रतिक्रिया येत आहेत, हे स्वतः वाचताही येत नव्हतं. कारण त्याचं शिक्षण चौथीतच थांबलं होतं.
ड्रायव्हरने उचलली शिक्षणाची जबाबदारी
अरुणची लोकप्रियता पाहून नेहरू यांनी केवळ त्याचा व्हिडीओ व्हायरल करण्यापलीकडे विचार केला. सोशल मीडियावर लाखो लोक त्याच्या हसण्याचं कौतुक करत होते; मात्र त्याच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने बदलण्यासाठी शिक्षणाची गरज होती, हे नेहरू यांच्या लक्षात आलं.
त्यानंतर त्यांनी अरुणला पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा निर्णय घेतला. त्याच्या अभ्यासासाठी पुस्तकं आणली, परीक्षेची फी भरली आणि दहावीच्या बोर्ड परीक्षेला बसण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत केली.
विशेष म्हणजे, ट्रकमधून प्रवास सुरू असतानाच अरुणचा अभ्यासही सुरू झाला. ट्रकची केबिन हीच त्याची वर्गखोली बनली. रस्त्यावरचा प्रवास, मुक्कामाच्या वेळा आणि मिळणाऱ्या मोकळ्या वेळेत नेहरू त्याला अक्षरओळख, गणित आणि इतर विषय शिकवू लागले.
अरुणने उत्तीर्ण केली दहावीची परीक्षा
एकीकडे ट्रकचा प्रवास आणि दुसरीकडे शिक्षणाचा ध्यास, अशा दुहेरी जबाबदारीतून अरुणने अभ्यास सुरू ठेवला. अखेर मार्च २०२६ मध्ये त्याने दहावीची बोर्ड परीक्षा उत्तीर्ण केली. ज्या मुलाला गरिबीमुळे चौथीनंतर शिक्षण सोडावं लागलं होतं, त्याने परिस्थितीवर मात करत दहावीपर्यंत मजल मारली.
अरुणसाठी हा केवळ परीक्षेतील विजय नाही, तर त्याचं हरवलेलं बालपण आणि अपूर्ण राहिलेलं स्वप्न पुन्हा जगण्याची संधी आहे. एका ट्रक ड्रायव्हरने दाखवलेल्या विश्वासामुळे आणि मदतीमुळे त्याला आयुष्याची नवी वाट मिळाली.







