शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा नवा चेहरा कोण? ‘या’ निष्ठावंत शिलेदारांच्या नावाची चर्चा

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) जयंत पाटील यांनी काल पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार होण्याचे सूतोवाच दिले. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वेगळाच धक्का दिला.
जयंत पाटील यांनी “मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा” अशी स्पष्ट आणि थेट मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे. यामुळे पक्षात नेतृत्वाच्या पातळीवर मोठ्या बदलाची शक्यता व्यक्त होत आहे.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरमध्ये पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जयंत पाटील म्हणाले की, “मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षांचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक असल्याची यानिमित्त साहेबांना विनंती करेन. शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. त्यांनी याविषयी त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा.” यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार) पुढचा प्रदेशाध्यक्ष कोण असणार? या चर्चा सुरू झाल्या आहेत. Sharad Pawar |
याकरिता ‘राष्ट्रवादी’च्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री शशिकांत शिंदे किंवा राजेश टोपे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. याशिवाय नव्या चेहऱ्यांमध्ये खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो, अशी चर्चा आहे.
राजेश टोपे
राजेश टोपे हे मराठवाड्यातील मातब्बर नेते असून मराठा समाजाचे आहेत. सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणूनही राजेश टोपे यांची ओळख आहे. राजेश टोपे फारसे वादग्रस्त नाहीत. कोरोना काळातील त्यांच्या कामाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष त्यांनी वेधून घेतले होते.
शशिकांत शिंदे
शशिकांत शिंदे हे पश्चिम महाराष्ट्रातील नेते आहेत. सातारा, नवी मुंबई भागात त्यांचा चांगला होल्ड आहे. ते अनुभवी नेते असून त्यांच्या नेतृत्वात पक्ष आक्रमकपणे काम करू शकतो. त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्या नावाची देखील चर्चा रंगली आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांनी केलेल्या मागणीवर कार्यक्रमात शरद पवार म्हणाले की, “जयंत पाटलांनी सांगितलेलं आहे नव्या चेहऱ्यांना संधी द्या. आपण सगळे त्यांच्यामागे उभे राहू या. तुमची मानसिकता वेगळी आहे हे कळलं. प्रमुख सहकाऱ्यांना एकत्र घेऊन सुसंवाद साधू आणि एकत्रित निर्णय घेऊ. प्रत्येक तालुक्यात नवे चेहरे दिसलेच पाहिजे.” Sharad Pawar |
‘राजीनामा दिला नाही…’
सुप्रिया सुळे यांनी मेळाव्यानंतर पाटील यांचा राजीनामा आला नसल्याचा दावा प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. पाटील यांनी असे काही पत्र दिले नाही किंवा त्यांनी तसे सांगितलेले नाही, असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा :
आता ९ ऐवजी १० तास ऑफिसमध्ये काम करावं लागणार ; ‘या’ राज्याने घेतला मोठा निर्णय





