दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यासह येथे नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून ती 17 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. निवडणूक आयोगाने 7 जानेवारीला विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली होती. राष्ट्रीय राजधानीत 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 8 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहेत.
भाजपने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून रमेश बिधुरी यांचे नाव पुढे करण्याचा निर्णय घेतला आहे, असा दावा दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि आपच्या नेत्या आतिशी यांनी शुक्रवारी केला. विशेष म्हणजे, भाजपने बिधुरी यांनाच कालकाजी मतदारसंघातून आतिशी यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे.
पत्रकार परिषदेत आतिशी यांनी संबंधित दावा केला. तसेच, विश्वासार्ह सुत्रांकडून ती माहिती मिळाल्याची पुस्तीही जोडली. बिधुरी नुकतेच काही वक्तव्यांवरून वादाच्या केंद्रस्थानी आले. आतिशी आणि कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या संदर्भातील त्यांची वक्तव्ये वादग्रस्त ठरली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे.
अशात बिधुरी यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे भाजपवर टीका करण्याची आयतीच संधी आप आणि कॉंग्रेसला मिळाली. भाजपची मानसिकता महिलाविरोधी असल्याचे त्या पक्षांनी म्हटले. वादंगानंतर भाजपच्या नेतृत्वाने बिधुरी यांना कानपिचक्या दिल्याची माहितीही समोर आली. अशात आतिशी यांनी केलेला दावा भुवया उंचावणारा ठरला आहे. तो खरा ठरणार का ते काही दिवसांत स्पष्ट होईल.





