नागपूर : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात लावणी नृत्य करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक महिला ‘मला जाऊ द्या ना घरी, वाजले की बारा’ या गाण्यावर नृत्य करताना दिसते, तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी समोर बसलेले दिसतात. या प्रकरणावरून विरोधकांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जिल्हाध्यक्षांना सात दिवसांत खुलासा देण्याची नोटीस बजावली आहे. आता या व्हिडिओतील महिला शिल्पा शाहीर यांनी समोर येत आपली बाजू मांडली आहे. शिल्पा शाहीर या नागपूरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या असून, त्या लावणी कलावंत म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांना राष्ट्रवादीच्या दिवाळी मिलन कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. “माझी मैत्रिण रेखा तरडे आणि सुनीता हेरणे यांनी आग्रह केल्याने मी या कार्यक्रमाला गेले. तिथे अनेक महिलांचा सत्कार झाला, माझाही सत्कार झाला. काहींनी गाणी सादर केली, तर मी लावणी कलावंत म्हणून छोटीशी लावणी सादर केली, लावणीमुळे माझी ओळख आहे आणि मला कार्यक्रमात लावणी सादर करण्यास सांगण्यात आले होते, असं शिल्पा यांनी सांगितले. कोण आहेत शिल्पा शाहीर? शिल्पा शाहीर या नागपूर परिसरातील प्रसिद्ध लावणी कलावंत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रायबा ईमानदार’ या मराठी चित्रपटातील ‘चहा पाण्याला पाहून बोलवा ना’ या लावणीत त्यांनी नृत्य सादर केले आहे. राष्ट्रवादीच्या नागपूर शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, “या कार्यक्रमासाठी कोणत्याही बाहेरील कलाकारांना बोलवले नव्हते. दिवाळी मिलनच्या निमित्ताने पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले होते आणि आपापली कला सादर करत होते.” खासदार सुनेत्रा पवार यांनीही याबाबत फोनवरून विचारणा केल्याचे अहिरकर यांनी सांगितले. या प्रकरणामुळे राष्ट्रवादीच्या कार्यालयातील लावणी नृत्य चांगलेच चर्चेत आले असून, यावरून राजकीय वादही पेटण्याची शक्यता आहे.