Pune District : बिबट आणि मानव संघर्षाला जबाबदार कोण?

डिंभे : बिबट आणि मानव संघर्ष म्हणजे जणू शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजल्यासारखेच दिसते. कधीकाळी जंगलात वास्तव्य करणारा बिबट सध्या जंगलांमध्ये तृणभक्षी प्राणी तसेच जलसाठ्यांचा अभावामुळे व जंगलांना नियमित लागणाऱ्या वणव्यांमुळे सह्याद्रीच्या कडे,कपारीमध्ये वास्तव्य करणारा बिबट्याने वनविरहित भूमीवर आपले बस्तान मांडले आहे. वन विभागाच्या सर्व उपाययोजनांवर तसेच सुरक्षेलाच छेद देत त्याने पशुधन व मानवावर गंभीर स्वरूपाचे प्राणघातक हल्ले करून जणू एक अस्मानी संकटाचा भस्मासूर उभा केला आहे.
गेली अनेक वर्ष वाढत्या औद्योगिक क्रांतीमुळे जंगले नष्ट होत आहेत. तसेच बदलत्या काळातील शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान यामुळे शेतकरी वर्गाचा ऊस शेतीकडे वाढलेला कल यामुळे मिश्र शेती पद्धती फारशी पाहायला मिळत नाही. यामुळे जंगलात वास्तव्य करणाऱ्या बिबट्याने ऊस शेतीला अधिक पसंत केले आहे. मादी बिबट्या तिची पिले लहान असतानाच त्यांना हे उसाचे क्षेत्र आपले घर असल्याचे बिंबवते. त्यामुळे जरी बिबट्यांना ऊस शेतीतून जंगलात नेऊन सोडले. तरीही ते पुन्हा उसाच्या फडातच आपला निवारा शोधतात.
२५ वर्षांत ५४ बळी
वनविभागाच्या जुन्नर, ओतूर, मंचर, घोडेगाव, खेड, चाकण आणि शिरूर या परिसरांपैकी जुन्नर व शिरूर हे दोन तालुके सध्या बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांचे केंद्रबिंदू ठरले आहेत. २५ वर्षांमध्ये या परिसरात अनेक पशुधन तसेच मानवांचे ५४ बळी गेल्याचे चित्र पहावयास मिळते. यामध्ये निष्पाप लहान बालके तसेच वृद्ध महिला यांचा समावेश जास्त आहे. वनविभाग सर्व उपाययोजनांची पराकष्टा करूनही तसेच शासन यंत्रणा युद्ध पातळीवर उपाययोजना करूनही बिबट व मानव संघर्ष हा दररोज पाहावयास मिळत आहे.
एकीकडे वनविभागाच्या शासकीय धोरणानुसार बिबट हा शेड्युल एकचा प्राणी असल्याने तसेच नैसर्गिक अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असल्याने त्याच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याला बंदिस्त करावे की नरभक्षक झाल्यावर गोळी घालावी, अशा गोंधळात प्राणिमित्र संघटना व शासन पडले आहे.
निसर्गाच्या नियमानुसार प्रथमत: बिबट्याची चाहूल ही कुत्र्यांना लागते. यामुळे या हल्ल्यांमध्ये पहिला बळी कुत्र्यांचा जातानाचे चित्र आहे. वाढते शहरीकरण तसेच जंगलांचा होणारा ऱ्हास, यामुळे जंगलातील असणारे अन्नसाखळीतील लहान,मोठे घटक नष्ट होत चालल्याने या अस्मानी संकटांना मानवच कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत आहे.
जंगलांचे संवर्धन तसेच राखीव वनक्षेत्राला संपूर्ण बाजूने सुरक्षित कंपाउंड करून त्यात पकडलेले बिबटे ठेवणे तसेच येणाऱ्या काळातील संकटातून उपाययोजना करण्यासाठी शासकीय पातळीवरून आणि ग्राम पातळीतूनही सहभाग असणे गरजेचे आहे. जनजागृती त्याचबरोबर सुरक्षित दृष्टिकोनातून उपाययोजना करणे, यासाठी गाव पातळीवर आपत्कालीन घटकाशी सामोरे जाण्यासाठी वन विभागामार्फत उपाययोजना करणे गरजेचे आहे. यातून वनविभाग व शेतकरी वर्गात समन्वय असणे गरजेचे आहे. यासाठी वनविभागाने वेगवेगळ्या पद्धतीने बिबट रेस्क्यू फोर्स तयार करून त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे.
-नवनाथ फलके, वन्यजीव अभ्यासक





