Vadgaon Maval : मावळच्या पूरस्थितीला जबाबदार कोण? विकासकामांमुळे वाढला पूराचा धोका?
ओढे-नाले बुजवल्याचा नागरिकांचा आरोप

वडगाव मावळ : चार-पाच दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती, दरडी कोसळण्याच्या घटना आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र या आपत्तीला केवळ अतिवृष्टी कारणीभूत नाही.
तर गेल्या काही वर्षांत गृहप्रकल्प आणि प्लॉटिंगसाठी नैसर्गिक ओढे-नाले बुजविणे, त्यांचे प्रवाह बदलणे आणि डोंगर फोडून विकासकामे करणे हीदेखील या संकटामागची मोठी कारणे आहेत, असा आरोप नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
गेल्या काही वर्षांत मावळ तालुक्यातील वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे, सोमाटणे फाटा, कान्हे, जांभूळ, साते, कामशेत तसेच मुंबई-पुणे महामार्गालगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण प्रकल्प, प्लॉटिंग योजना आणि व्यावसायिक विकासकामे झाली आहेत.
याशिवाय आंदर मावळ परिसरातही डोंगरपायथ्यावरील जागा खरेदी करून फार्महाऊस आणि प्लॉटिंग प्रकल्प उभारण्यात आले. या विकासकामांदरम्यान अनेक ठिकाणी नैसर्गिक ओढे-नाले बुजविण्यात आले, प्रवाहात बदल करण्यात आल्याचा तसेच डोंगरांमध्ये स्फोटकांचा वापर करून खोदकाम करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, विकासकामांसाठी डोंगर कापणे, उतारांवर मातीचा भराव टाकणे आणि नैसर्गिक पाण्याचे मार्ग बंद करणे, यामुळे जमिनीची नैसर्गिक रचना बदलली आहे. परिणामी, मुसळधार पावसात मातीचा धरून ठेवण्याचा नैसर्गिक आधार कमी झाल्याने काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत.
तसेच पावसाचे पाणी पूर्वीच्या नैसर्गिक मार्गाने न वाहता थेट वसाहती आणि शेतीकडे वळत असल्याने नुकसानाचे प्रमाण वाढत आहे. शहरी भागात उभारण्यात आलेल्या अनेक गृहप्रकल्पांमध्ये बांधकामासाठी अडथळा ठरणारे ओढे आणि नाले बंदिस्त करून त्यामध्ये लहान व्यासाचे पाईप टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
उन्हाळ्यात या पाईपमधून पाण्याचा प्रवाह सहज होतो, मात्र पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी आल्यावर त्यातून निचरा होत नाही. परिणामी, पाणी अडून राहते आणि त्याचा फटका आजूबाजूच्या घरांना, रस्त्यांना आणि शेतांना बसत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
पूरसदृश परिस्थितीला अतिक्रमण कारणीभूत?
यंदाच्या पावसात वडगाव शहरात निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीमागेही अशाच प्रकारचे अतिक्रमण कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. सांगवी रस्त्यावरील खापरे ओढा, प्रभाग क्रमांक १७ मधील मोरया कॉलनी, दिग्विजय कॉलनी, दत्त मंदिर परिसर आणि न्यू इंग्लिश स्कूलजवळील भागात पाणी साचले.
नागरिकांच्या मते, या परिसरातील नैसर्गिक ओढे-नाले बुजवून भूमिगत पाईप टाकण्यात आले. पावसाळ्यात हे पाईप अपुरे पडल्याने पाण्याला बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळाला नाही आणि परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
गृहप्रकल्पांना नगरपंचायतीकडून मंजुरी दिली जाते, मात्र प्रत्यक्ष काम नियमानुसार होत आहे की नाही, याची प्रभावी तपासणी होत नसल्याचा आरोप केला जात आहे. मंजूर आराखड्यांमध्ये असलेले नैसर्गिक जलमार्ग प्रत्यक्षात कायम ठेवले जातात का, याची पडताळणी करण्यासाठी सक्षम यंत्रणा कार्यरत आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
साते ग्रामपंचायत हद्दीतही अशीच परिस्थिती
साते ग्रामपंचायत हद्दीतही अनेक ठिकाणी पारंपरिक ओढ्यांचे प्रवाह बदलण्यात आले असून गृहप्रकल्पांसाठी सीमाभिंती उभारून नैसर्गिक जलमार्ग अडविण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
अहिरवडे परिसरातून येणाऱ्या जुन्या ‘खापरे ओढ्या’वर भराव टाकून अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काही ठिकाणी ओढा साफसफाईच्या नावाखाली त्याचा मार्ग बदलण्यात आला, तर घरबांधणीचा मलबा आणि कचराही ओढ्यात टाकण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले.
Sharvari Wagh: उकडीचे मोदक की पुरणपोळी? शर्वरी वाघचं उत्तर ऐकून चाहत्यांनाही हसू आवरणार नाही





