Sharvari Wagh: उकडीचे मोदक की पुरणपोळी? शर्वरी वाघचं उत्तर ऐकून चाहत्यांनाही हसू आवरणार नाही
Sharvari Wagh शर्वरी वाघने आपल्या अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘मुंज्या’ या चित्रपटानंतर तिची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. त्यानंतर आलेल्या चित्रपटांनाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.

Sharvari Wagh: मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ सध्या तिच्या ‘अल्फा’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आलिया भट्ट, बॉबी देओल, हृतिक रोशन आणि अनिल कपूर यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवरही तो चांगली कमाई करत आहे. मात्र, चित्रपटाइतकीच सध्या शर्वरीची आणखी एका कारणामुळे चर्चा रंगली आहे. तिच्या आवडत्या मराठी पदार्थांविषयी तिने दिलेली उत्तरे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.
‘अल्फा’च्या प्रमोशनदरम्यान शर्वरी आणि आलिया भट्ट यांनी अनेक मुलाखती दिल्या. विविध कार्यक्रम, कॉलेज आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दोघीही चाहत्यांशी संवाद साधताना दिसल्या. अशाच एका मुलाखतीत शर्वरीला मराठी खाद्यसंस्कृतीशी संबंधित एक मजेशीर टास्क देण्यात आला. तिला दोन पदार्थांची नावे सांगण्यात आली आणि त्यापैकी तिला अधिक आवडणारा पदार्थ निवडण्यास सांगितले.
सुरुवातीला तिला ‘पावभाजी की मिसळपाव?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर शर्वरीने क्षणाचाही विलंब न लावता ‘मिसळपाव’ची निवड केली. त्यानंतर ‘वडापाव की कोथिंबीर वडी?’ असा प्रश्न विचारला असता तिने ‘कोथिंबीर वडी’ला पसंती दिली. पुढे ‘थालीपीठ की साबुदाणा खिचडी?’ असा पर्याय दिल्यावर तिने ‘साबुदाणा खिचडी’ हा पदार्थ अधिक आवडत असल्याचे सांगितले.
Sharvari Wagh
मात्र, खरी गंमत पुढे झाली. शर्वरीसमोर ‘पुरणपोळी की उकडीचे मोदक?’ असा प्रश्न ठेवण्यात आला. हा प्रश्न ऐकताच ती काही क्षण विचारात पडली. अखेर हसतच तिने उत्तर दिले की, या दोन्ही पदार्थांपैकी एकाची निवड करणे तिच्यासाठी अशक्य आहे. कारण तिला पुरणपोळी आणि उकडीचे मोदक हे दोन्ही पदार्थ मनापासून आवडतात. तिच्या या उत्तरामुळे मराठी खाद्यपदार्थांबद्दलचे तिचे प्रेम पुन्हा एकदा समोर आले.
यानंतर तिला ‘अळूवडी की बटाटावडा?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर शर्वरीने सांगितले की, घरी बनवलेली अळूवडी खायला तिला विशेष आवडते. ‘शिरा की बासुंदी?’ या प्रश्नावर तिने ‘शिरा’ची निवड केली, तर ‘पोहे की उपीट?’ या पर्यायात तिने पोह्यांना पसंती दिली.
या मजेशीर खेळाच्या शेवटी शर्वरीला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला. तिला हे सर्व पदार्थ बनवता येतात का, असे विचारले असता ती हसत म्हणाली, “मला हे पदार्थ बनवता येत नाहीत. मला फक्त ते मनापासून खाता येतात.” तिचे हे प्रामाणिक आणि विनोदी उत्तर चाहत्यांनाही खूप आवडले.
शर्वरी वाघने आपल्या अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘मुंज्या’ या चित्रपटानंतर तिची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. त्यानंतर आलेल्या चित्रपटांनाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. सध्या ‘अल्फा’मधील तिच्या भूमिकेचे कौतुक होत असून आगामी काळात ती आणखी कोणत्या दमदार चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार, याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
अभिनयासोबतच आपल्या साधेपणामुळे, मराठी संस्कृतीशी असलेल्या नात्यामुळे आणि मराठमोळ्या खाद्यपदार्थांवरील प्रेमामुळे शर्वरी वाघ चाहत्यांच्या अधिक जवळ येताना दिसत आहे. विशेष म्हणजे, उकडीचे मोदक आणि पुरणपोळी यांपैकी एकाची निवड न करता दोन्ही पदार्थांवर समान प्रेम असल्याचे तिने सांगितल्याने अनेक मराठी खाद्यप्रेमींनाही तिचे उत्तर आपलेसे वाटत आहे.





