Liz Mejo: कोण आहे लिज मैजो? वयाच्या १९व्या वर्षी जिंकला मिस युनिव्हर्स इंडिया २०२६चा किताब
Liz Mejo ग्रँड फायनलमध्ये लिजसह तमिळनाडूची वैष्णवी, महाराष्ट्राची तेजस्विनी श्रीवास्तव, गुजरातची अनुश्री सतवालेकर आणि उत्तराखंडची अनुभा वशिष्ठ या टॉप-५ स्पर्धकांनी अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं. रात्री उशिरा विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. मिस युनिव्हर्स इंडिया २०२५ची विजेती मनिका विश्वकर्मा हिने लिजला मुकुट घातला.

Liz Mejo: केरळची १९ वर्षीय कैजिया लिज मैजो हिने मिस युनिव्हर्स इंडिया २०२६ हा मानाचा किताब पटकावला आहे. जयपूरमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या ग्रँड फायनलमध्ये देशभरातील ५३ स्पर्धकांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. अखेर लिज मैजो हिच्या डोक्यावर विजेतेपदाचा मुकुट चढवण्यात आला.
ग्रँड फायनलमध्ये लिजसह तमिळनाडूची वैष्णवी, महाराष्ट्राची तेजस्विनी श्रीवास्तव, गुजरातची अनुश्री सतवालेकर आणि उत्तराखंडची अनुभा वशिष्ठ या टॉप-५ स्पर्धकांनी अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं. रात्री उशिरा विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. मिस युनिव्हर्स इंडिया २०२५ची विजेती मनिका विश्वकर्मा हिने लिजला मुकुट घातला.
कोण आहे लिज मैजो?
लिज मैजो ही केरळची रहिवासी असून ती सध्या बंगळुरूमध्ये कायद्याचं शिक्षण घेत आहे. ती मॉडेलिंगसोबतच क्लासिकल डान्समध्येही पारंगत आहे. २०२६ मध्येच तिने मिस युनिव्हर्स केरळ २०२६ हा किताबही जिंकला होता.
विशेष म्हणजे, सौंदर्य स्पर्धांच्या क्षेत्रात लिजसाठी हे पहिलंच मोठं यश नाही. २०२५ मध्ये ती मिस टीन इंटरनॅशनल २०२५ स्पर्धेत फर्स्ट रनर अप ठरली होती. याआधी तिने मिस टीन इंडिया हा किताबही जिंकला होता. त्यानंतर तिला आंतरराष्ट्रीय स्तरावरील टीन ब्युटी पेजेंटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.
शिक्षणासोबत मॉडेलिंग आणि नृत्याची आवड
लिज मैजो ही केवळ मॉडेल म्हणूनच ओळखली जात नाही. ती कायद्याचं शिक्षण घेत असून क्लासिकल डान्सचीही आवड जोपासत आहे. शिक्षण आणि मॉडेलिंग या दोन्ही गोष्टींचा समतोल साधत तिने सौंदर्य स्पर्धांच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लिज ही मेजो अब्राहम आणि सुजा मेजो यांची मुलगी आहे. सध्या ती कोच्चीमध्ये राहत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सोशल मीडियावरही लोकप्रिय
लिज सोशल मीडियावरही सक्रिय आहे. ती आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या सोशल मीडिया अकाउंटला सुमारे ३९ हजार फॉलोअर्स आहेत. लिज मानसिक आरोग्य आणि वैयक्तिक विकासासारख्या विषयांवरही व्यक्त होताना दिसते. त्यामुळे तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या विचारांमुळेही ती चर्चेत असते.

Kaziah Liz Mejo crowned Miss Universe India 2026
अंतिम फेरीत कोण ठरलं रनर अप?
मिस युनिव्हर्स इंडिया २०२६च्या अंतिम निकालात तमिळनाडूची वैष्णवी फर्स्ट रनर अप ठरली. गुजरातची अनुश्री सतवालेकर सेकंड रनर अप ठरली. महाराष्ट्राची तेजस्विनी श्रीवास्तव थर्ड रनर अप, तर उत्तराखंडची अनुभा वशिष्ठ फोर्थ रनर अप ठरली.
या स्पर्धेच्या परीक्षक मंडळात अभिनेत्री सुष्मिता सेन, सेलिना जेटली आणि उर्वशी रौतेला यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश होता. विशेष म्हणजे, सुष्मिता सेन यांनी १९९४ मध्ये भारतासाठी मिस युनिव्हर्सचा जागतिक किताब जिंकला होता.
आता जागतिक मंचावर भारताचं प्रतिनिधित्व
मिस युनिव्हर्स इंडिया २०२६चा किताब जिंकल्यानंतर लिज मैजो आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. यावर्षीच्या अखेरीस प्यूर्टो रिकोमध्ये होणाऱ्या ७५व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत ती सहभागी होणार आहे.
केरळमधून सुरू झालेला लिजचा प्रवास आता जागतिक मंचापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आगामी मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करताना लिज कशी कामगिरी करते, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.





