जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या DeepSeek AI ची निर्मिती करणारे लिआंग वेनफेंग कोण आहे? किती संपत्तीचे मालक? वाचा

DeepSeek AI: सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा बोलबाला आहे. बाजारात एआयवर आधारित अनेक नवनवीन अॅप्स येत असतात. यात आता चीनच्या DeepSeek AI ची भर पडली आहे. डीपसीकची लोकप्रियता एवढी वाढली आहे की, यामुळे अमेरिकेतील दिग्गज तंत्रज्ञाना क्षेत्रातील कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.
चीनच्या एका 40 वर्षीय तरूणाने अगदी कमी खर्चात ChatGPT, Meta, Gemini, Microsoft Copilot यांना टक्कर देणारे एआय मॉडेल तयार केले आहे. DeepSeek-V3 या मॉडेलच्या प्रशिक्षणासाठी केवळ 6 मिलियन डॉलर्सपेक्षा कमी खर्च आल्याचा दावा कंपनीकडून केला जात आहे.
DeepSeek AI काय आहे?
डीपसीक ही चीनची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी आहे. या कंपनीनेच जनरेटिव्ह एआय चॅटबॉट DeepSeek-V3 ची निर्मिती केली आहे. हे एआय आधारित चॅटबॉट मॉडेल अगदी ChatGPT प्रमाणे आहे. मात्र, कमी खर्चात निर्मिती होण्यासोबतच हे ChatGPT पेक्षा अधिक जलद व चांगल्याप्रकारे प्रतिसाद देते. याचा वापर गणित, कोडिंग, नॅच्युरल लँग्वेज रिजनिंगसह वेगवेगळ्या कामासाठी केला जाऊ शकतो.
DeepSeek AI ची निर्मिती कोणी केली?
DeepSeek या कंपनीची स्थापना 40 वर्षीय लिआंग वेनफेंग यांनी केली आहे. चीनच्या हांगझाऊ या शहरात कंपनीची स्थापना करण्यात आली. 2023 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. तर आता डीपसीकचे नवीन मॉडेल सर्वांसाठी उपलब्ध झाले आहे.
लिआंग वेनफेंग यांचा जन्म चीनमधील झानजियांग येथील एका साध्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण सामान्य शाळेत झाले. मात्र, नंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर प्रभुत्व मिळवले. त्यांनी 2013 मध्ये हांगझोउ याकेबी इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट आणि 2015 मध्ये झेजियांग जिउझांग अॅसेट मॅनेजमेंटची स्थापना केली.
2019 मध्ये त्यांनी हाय-फ्लायर एआय लाँच केले होते. मात्र, 2023 मध्ये एनव्हिडियाच्या कमी दर्जेच्या चिप्सचा वापर करून DeepSeek ची निर्मिती केली. आता याचे नवीन मॉडेल लाँच करून जगभरात खळबळ उडवून दिली. 40 वर्षीय लिआंग वेनफेंग हे 3.2 बिलियन डॉलर (जवळपास 28 हजार कोटी रुपये) संपत्तीचे मालक आहेत.





