OpenAI Office : भारतातील ‘या’ शहरात सुरू होणार ChatGPT बनवणाऱ्या OpenAI चे पहिले ऑफिस

भारत ही आयटी कंपन्यांसाठी एक महत्त्वाची आणि विस्तारणारी बाजारपेठ आहे. गेल्या काही दशकांमध्ये अनेक जागतिक आयटी कंपन्यांनी भारतातील विविध शहरांमध्ये आपली कार्यालये स्थापन केली असून, यामध्ये आता ChatGPT ची निर्माती कंपनी OpenAI ची भर पडणार आहे. OpenAI यावर्षी 2025 च्या अखेरीस नवी दिल्लीत आपले पहिले भारतीय ऑफिस उघडणार आहे.
भारतात का उघडत आहे ऑफिस?
OpenAI आपली जागतिक उपस्थिती अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने भारतात पाऊल टाकत आहे. भारत ही कंपनीसाठी एक मोठी आणि संभाव्य बाजारपेठ आहे. या नवीन ऑफिससाठी OpenAI ने स्थानिक टीम नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही टीम स्थानिक भागीदार, सरकार, विकासक, व्यावसायिक कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांशी संबंध प्रस्थापित करून त्यांना बळकटी देण्यावर लक्ष केंद्रित करेल.
भारतातील प्रचंड संधी
OpenAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सॅम ऑल्टमन यांनी भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील प्रचंड संधींवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “भारतात AI साठी अविश्वसनीय संधी आहे. जागतिक AI नेतृत्वासाठी भारताकडे सर्व आवश्यक घटक आहेत – उत्कृष्ट तंत्रज्ञान, जागतिक दर्जाचे डेव्हलपर इकोसिस्टम आणि इंडिया AI मिशनद्वारे सरकारचा मजबूत पाठिंबा. भारतात AI अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक बनवण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. आम्ही भारतासाठी आणि भारतासोबत AI विकसित करण्यास वचनबद्ध आहोत.”
केंद्रीय मंत्र्यांनी केले स्वागत
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी OpenAI च्या या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले, “OpenAI चा भारतात ऑफिस उघडण्याचा निर्णय हा देशाच्या डिजिटल नवोन्मेष आणि AI क्षेत्रातील वाढत्या नेतृत्वाचे द्योतक आहे. भारतात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, AI प्रतिभा आणि एंटरप्राइझ स्केल सोल्यूशन्समधील मजबूत गुंतवणुकीमुळे देश AI परिवर्तनाच्या पुढील लाटेला चालना देण्यासाठी सज्ज आहे. प्रत्येक नागरिकापर्यंत AI चे फायदे पोहोचवण्याच्या दृष्टिकोनाला पुढे नेण्यासाठी आम्ही OpenAI च्या भागीदारीचे स्वागत करतो.” OpenAI च्या या पावलामुळे भारतातील AI क्षेत्राला नवीन गती मिळेल आणि जागतिक तंत्रज्ञान परिदृश्यात भारताचे स्थान आणखी मजबूत होईल.





