नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीत आयोजित ‘संघ यात्रा १०० वर्षे: नवे क्षितिज’ या कार्यक्रमात हिंदूंची व्याख्या स्पष्ट केली. संघाच्या शतकपूर्ती निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात भागवत यांनी सांगितले की, “हिंदू तो आहे, जो स्वतःच्या मार्गावर चालण्यावर विश्वास ठेवतो आणि वेगवेगळ्या श्रद्धा असलेल्या लोकांचाही आदर करतो.” भारत माता की जय हेच संघाचं सार – भागवत म्हणाले, “संघ आपली १०० वर्षांची यात्रा पूर्ण करत आहे. संघाचं सार आपल्या रोजच्या प्रार्थनेतील शेवटच्या ओळीत आहे, ‘भारत माता की जय’. हा आपला देश आहे, त्याचा गौरव करायला हवा आणि तो जगात अव्वल बनवण्यासाठी कार्य करायला हवे.” जागतिक पातळीवर विचार करा – जग जवळ आले आहे, त्यामुळे आपल्याला जागतिक पातळीवर विचार करायला हवा, असे सांगताना भागवत यांनी स्वामी विवेकानंदांचा उल्लेख केला. “प्रत्येक राष्ट्राला एक ध्येय असते. भारताचेही योगदान आहे. संघाची स्थापना भारतासाठी झाली, त्याचे कार्य भारतासाठी आहे आणि भारताला ‘विश्वगुरू’ बनवण्यात त्याचे महत्त्व आहे. भारताच्या जागतिक योगदानाचा वेळ आता आला आहे,” असे ते म्हणाले. सावरकरांचा उल्लेख – क्रांतिकारकांच्या लाटेचा उल्लेख करताना भागवत म्हणाले, “स्वातंत्र्योत्तर काळात क्रांतीचा उद्देश संपला. सावरकर हे त्या लाटेतील रत्न होते. ती लाट आता नाही, त्याची गरजही नाही. पण त्या लाटेने देशासाठी जगण्याची आणि मरण्याची प्रेरणा दिली. १८५७ च्या उठावानंतर काहींनी राजकारणाला स्वातंत्र्याचा मार्ग बनवले आणि त्यातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा जन्म झाला. त्या आंदोलनाने स्वातंत्र्य मिळवले, पण स्वातंत्र्यानंतरही त्या लाटेने अपेक्षित प्रकाश टाकला असता, तर आज चित्र वेगळे असते. ”हिंदू राष्ट्र म्हणजे काय? हिंदू राष्ट्राविषयी बोलताना भागवत म्हणाले, “हिंदू राष्ट्राचा सत्ता किंवा शासनाशी संबंध नाही. ‘राष्ट्र’ ही पाश्चिमात्य संकल्पना नाही, जिथे राष्ट्र आणि राज्य एकत्र येतात. हिंदू राष्ट्रात सर्वांना बिना भेदभाव न्याय मिळतो.” संघाच्या शतकपूर्तीच्या या कार्यक्रमात भागवत यांनी भारताच्या सांस्कृतिक आणि वैश्विक भूमिकेवर जोर देत संघाच्या भविष्यातील दिशेवर प्रकाश टाकला.