कुंडमळा येथील पूल नक्की कोणाचा? बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेचे एकमेकांकडे बोट

पुणे – कुंडमळा (ता.मावळ) येथील लोखंडी पुल कोसळल्याची दुर्घटना घडली. त्यामुळे हा पुल नक्की कोणी बांधला, तसेच याची मालकी कोणाकडे आहे, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद यांच्याकडे चौकशी केली असता, दोन्ही विभागांनी हात वर केले असून, हा पूल आमचा नसल्याचे ठामपणे सांगत आहे. दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवित आहे. त्यामुळे कुंडमळा येथील पूल नक्की कोणाचा, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
इंद्रायणी नदीच्या पात्रात असलेले कुंडजाई मातेचे मंदिर त्याच बाजूला असलेले कुंडमळा, तर दुसऱ्या बाजूला असलेले शेलारवाडी या दोन्ही गावांना जोडण्यासाठी येथे मागील 30 वर्षांपूर्वी हा पादचारी पूल बांधण्यात आला. त्यावरून स्थानिक नागरिक ये- जा करत होते. खासदार निधीतून हा पूल बांधल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. हा पूल जुना झाल्याने, तसेच वापरास योग्य नसल्याने हा पूल बंद करण्यात आला होता. तशा आशयाचे फलक दोन्ही बाजूंना लावण्यात आले होते.
प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभाग हे राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवरील पुलांची देखभाल करतात. काही ग्रामीण रस्ते आणि त्यावरील पुलांची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे असते. महापालिका हद्दीतील पुलांची जबाबदारी पालिकेची असते, तर राष्ट्रीय महामार्गवरील पुलांची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची असते.
हा पूल कोणाच्या अखत्यारीत होता, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की हा पूल आमच्या अखत्यारीत नाही. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनीही हा पूल आमचा नाही, असेच सांगितले. त्यामुळे त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कोणाकडे, अशा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरून दोन्ही विभाग आपली जबाबदारी टाळत असल्याचे दिसून येत आहे.
अहवालानंतरच कळणार हा पूल कोणाचा
जिल्हा प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक बोलविली आहे. त्यामध्ये हा पुल नक्की कोणाचा आहे, याचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे.




