Bhupender Yadav : भाजपचे महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्त झालेले भूपेंद्र यादव नेमके आहेत कोण?

येत्या काही महिन्यांमध्ये महाराष्टात विधानसभेच्या निवडणूका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून प्रभारी आणि सह प्रभारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी भूपेंद्र यादव यांची प्रभारी आणि अश्विनी वैष्णव यांच्यावर सह प्रभारी म्हणून महाराष्ट्रासाठी निवड करण्यात आली आहे. तर महाराष्ट्राची धुरा सांभाळणारे भूपेंद्र यादव नेमके कोण आहेत जाणून घेऊया…
कोण आहेत भूपेंद्र यादव?
भूपेंद्र यादव हे नरेंद्र मोदींचे विश्वासू आहेत. सध्या ते केंद्रात मंत्री आहेत. केंद्रीय कामगार आणि रोजगार, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री म्हणून सध्या काम पाहत आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीसदेखील आहेत. आजच त्यांची भाजपकडून महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थीदशेपासून त्यांची राजकारणाला सुरुवात झाली. भूपेंद्र यादव हे वयाच्या 7 व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले. ते राजस्थानमधून 2 वेळा राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. ते मूळचे गुरुग्राम जिल्ह्यातील जमालपूर गावचे रहिवाशी आहेत.
भूपेंद्र यादव यांचे शालेय ते महाविद्यालय पर्यंतचे शिक्षण राजस्थानमध्ये झाले. विद्यार्थीदशेतच त्यांनी सक्रिय राजकारणात सहभाग घेतला. कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते भाजपच्या राजकारणात सक्रिय झाले. अनेक वर्षे वकिली केल्यानंतर ते भाजपशी पूर्णवेळ जोडले गेले.





