दुसऱ्यानेच स्वीकारला राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार? समान नावामुळे गोंधळ की बोगसगिरी

कटक : भारतातील पद्मश्री या प्रतिष्ठेच्या पुरस्काराच्या संदर्भात निर्माण झालेल्या एका वेगळ्याच वादावरूप ओरिसा उच्च न्यायालयाने मंगळवारी एकाच नावाच्या दोन व्यक्तींना नोटीस बजावली असून त्यांना २४ फेब्रुवारी रोजी त्यांची बाजू मांडण्यास सांगितले. दोघांनीही २०२३ मध्ये पद्मश्री पुरस्कार त्यांनाच देण्यात आल्याचा दावा केला आहे.
२०२३ च्या पद्मश्री पुरस्कार विजेत्यांच्या यादीत, ओडिशाचे श्री अंतर्यामी मिश्रा यांचे नाव ५६ व्या स्थानावर होते. साहित्य आणि शिक्षणातील योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्याची घोषणा करण्यात आली होती. पेशाने पत्रकार असलेल्या अंतर्यामी मिश्रा यांनी दिल्लीला जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून हा पुरस्कार स्वीकारला.
मात्र त्यानंतर डॉक्टर असणाऱ्या अन्य एका अंतर्यामी मिश्रा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि दावा केला की त्यांच्या वतीने त्याच नावाच्या दुसऱ्या व्यक्तीने हा पुरस्कार स्वीकारला आहे. रिट याचिका दाखल करणाऱ्या डॉक्टरने असा दावा केला आहे की त्यांनी ओडिया आणि इतर भारतीय भाषांमध्ये २९ पुस्तके लिहिली आहेत ज्यामुळे त्यांचे नाव २०२३ च्या पद्मश्री पुरस्कार विजेत्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
याचिकाकर्त्याच्या मते, पत्रकाराच्या नावावर कोणतेही पुस्तक नाही. सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती एसके पाणिग्रही म्हणाले की, सरकारने कडक पडताळणी प्रक्रिया केली असूनही, समान नावांमुळे गोंधळ निर्माण झाला आहे, ज्यामुळे निवड प्रक्रियेच्या विश्वासार्हतेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. न्यायालयाने दोन्ही दावेदारांना त्यांचे दावे सिद्ध करण्यासाठी सर्व प्रकाशने आणि साहित्यासह हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात, भारतीय संघासह प्रतिवादींना नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.





