सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात स्थापन एसआयटीतील अधिकारी कोण आहेत? जाणून घ्या

मुंबई – राज्य शासनाकडून संतोष देशमुख हत्येप्रकरणी एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वात ही समिती स्थापन करण्यात आली आहे. तेली यांच्यासह 10 जणांची टीम या घटनेचा सखोल तपास करणार आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासला वेग येणार आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला असून खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडलाही पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी दिली असून संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार आरोपींचाही शोध घेतला जात आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांच्या हत्येप्रकरणी केज पोलीस ठाणे, बीड येथे गु. र. क्र. ६३७/२०२४ भा.न्या.सं., कलम १४०(१), १२६(२), ११८(१), ३२४(४) (५), १८१(२), १९१(२), १९०, १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली (भा.पो.से.), पोलीस उपमहानिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा (EOW), सी.आय.डी., पुणे यांच्या अध्यक्षतेखाली “विशेष तपास पथक (SIT)” स्थापन करण्यात आले आहे. तसेच, बसवराज तेली यांनी शासनाकडे मागणी केल्यानुसार सदर विशेष तपास पथकामध्ये खालील काही अधिकारी व अंमलदार यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.
बसवराज तेली कोण आहेत?
नागपूर शहर पोलीस उपायुक्त म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर बसवराज तेली यांच्याकडे सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली होती. सन 2010 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले डॉ. तेली हे एमबीबीएस डॉक्टर असून ते मूळचे बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील खंदीबुद या गावाचे सुपुत्र आहेत. पोलीस दलातील त्यांच्या सेवेस महाराष्ट्रातील पाचोरा (जि.जळगाव) येथून झाली. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून, पुणे येथे सह उपायुक्त म्हणून काम केले. तर, सांगलीचे पोलीस अधीक्षकपदही सांभाळले होते, सध्या ते पोलीस उपमहानिरीक्षकपदावर कार्यरत आहेत.
10 जणांची SIT टीम –
-आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली – पोलीस उपमहानिरीक्षक
-अनिल गुजर – पो. उप अधीक्षक
-विजयसिंग शिवलाल जोनवाल- स.पो. निरीक्षक
-महेश विघ्ने – पो.उ.निरीक्षक
-आनंद शंकर शिंदे- पो.उ.निरीक्षक
-तुळशीराम जगताप – सहा. पो. उ. निरीक्षक
-मनोज राजेंद्र वाघ – पोलीस हवालदार/१३
-चंद्रकांत एस.काळकुटे – पोलीस नाईक /१८२६
-बाळासाहेब देविदास अहंकारे – पोलीस नाईक/१६७३
-संतोष भगवानराव गित्ते – पोलीस शिपाई/४७१





