राइस पुलिंग स्कॅममध्ये फसलेले ‘बडे लोग’ कोण?

87 कोटी रुपयांच्या बनावट नोटांचे धागेदोरे
सूत्रधारांनी अनेकांना गंडा घातल्याची शक्यता
– संजय कडू
पुणे – विमानतळ परिसरात सापडलेल्या तब्बल 87 कोटी रुपयांच्या बनावट नोटांचे धागेदोरे राइस पुलिंग स्कॅमशी जोडले गेले आहेत. देशभरात मागील काही वर्षे राइस पुलिंग स्कॅम गाजत आहे. तर त्यासंबंधी धागेदारे असणाऱ्यांकडे प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट नोटा सापडल्या आहेत. या सूत्रधारांनी अनेकांना गंडा घातल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र, बदनामी आणि आयकर विभागाच्या भीतीपोटी कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नाही. संबंधित नोटांचे व्हिडीओ मागील अनेक आठवडे शहरातील बडे व्यापारी, उद्योगपती आणि धनिकांमध्ये फिरत होते.
“इस्रो’ आणि “नासा’शी जोडला जातो संबंध
राइस पुलिंग मशीन हे एका कलशासारखे असते. बहुतांश प्रकरणात ते “मेड इन चायना’ असल्याचे आढळले आहे. हा कलश त्याच्या ऊर्जेने तांदळाचे दाणे खेचून घेतो. तसे व्हिडीओ प्रसारित केले जातात तसेच पीडिताला त्याचे प्रात्यक्षिकही दाखवले जाते. “या मशीनवर जर आकाशातील वीज पडली असेल, तर ते मशीन ओरिजनल असल्याचे सांगितले जाते. या मशिनच्या ऊर्जेचा वापर सॅटेलाइट यंत्रणेसाठी केला जातो. याला “इस्रो’ आणि “नासा’सारख्या संशोधन संस्थांतून मागणी आहे. या संस्था हे मशीन करोडो देऊन घेतात,’ असे भासवले जाते. अशाप्रकारे हे मशीन समोरच्या व्यक्तीच्या गळ्यात लाखो रुपयांना मारले जाते. याची प्रत्यक्ष किंमत मात्र दीड-दोन हजार रुपये इतकीच आहे.
कथित शास्त्रज्ञ करतो मशीनची तपासणी
गळाला लागलेल्या व्यक्तीला मशीन ओरिजनल आहे का? याची पडताळणी करण्यासाठी “शास्त्रज्ञांना बोलवावे लागेल’ असे राइस पुलिंग स्कॅममधील आरोपी सांगतो. शास्त्रज्ञ दिल्ली किंवा दुबईतून येणार असल्याचे सांगत त्याच्या प्रवास, राहण्याचा खर्च आणि तपासणी फीसाठी लाखो रुपयांची मागणी केली जाते. ही रक्कम समोरच्या व्यक्तीच्या ऐपतीप्रमाणे घेतली जाते. काही प्रकरणांत ही रक्कम 15 लाख रुपयांपर्यंत घेतलेली आहे. यानंतर शास्त्रज्ञ मशीनमध्ये एखादी तांत्रिक अडचण असल्याचे सांगत ती दूर करण्यासाठी पुन्हा एक ते दहा लाखांपर्यंत रक्कम उकळतो. अशा प्रकारे समोरच्या व्यक्तीच्या खिशातून शक्य असेल तितके पैसे उकळले जातात. या भूलथापांना बळी पडून अनेकांचे खिसे रिकामे झाले आहेत.
बनावट नोटा प्रकरणातील एका आरोपीवर यापूर्वी राइस पुलिंग फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. संबंधित आरोपी बनावट नोटांचे व्हिडीओ दाखवून राइस पुलिंग मशीनच्या सहाय्याने करोडो रुपये कमावता येत असल्याचा प्रसार करत होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी किती जणांची फसवणूक केली आहे याचा सर्व बाजूंनी शोध घेतला जात आहे.
– अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त





