पांढऱ्या रेशन कार्डधारकांना मिळणार जनआरोग्यसेवेचा लाभ

मुंबई : देशात सध्या केशरी आणि पिवळे रेशन कार्डधारकांना महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा लाभ मिळत होता. मात्र आता सरकारने या निर्णयात बदल केले असून पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना सुद्धा या योजनेत समाविष्ट केले आहे. यापूर्वी शासनाच्या केशरी व पिवळ्या रेशन कार्ड धारक या योजनेचा लाभ घेत होते मात्र पांढऱ्या रेशन कार्ड धारक या सेवेपासून वंचित राहत होते.
सरकारने योजनेचा फेरविचार करून पांढऱ्या रेशन कार्डधारकांना या योजनेत समाविष्ट करण्यासाठी शासकीय परिपत्रक काढले आहे. या योजनेमध्ये इतर रेशन कार्ड धारकांप्रमाणे पांढऱ्या रेशनकार्डधारकांनासुद्धा ५ लाखांपर्यत मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून दिले आहे.
आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक असतील तरच या कार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याने पांढरी शिधापत्रिका आधारकार्डला जोडण्याची मोहीम राबवावी, अशी सूचना अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना केली आहे. तसेच पांढऱ्या रेशन कार्डधारकांनी सुद्धा पुढाकार घेऊन त्यांचे रेशनकार्ड आधार कार्डशी लिंक करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.





