White House: व्हाइट हाऊसमध्ये ट्रंपची बैठक, पण दोन वर्षांच्या मुलाने जिंकली सगळ्यांची मने!
White House ट्रॅविस स्मिथ हा साधा मुलगा नाही. त्याची कहाणी खूप प्रेरणादायी आहे. तो जन्मतःच पूर्णपणे बहिरा होता. त्याला कोणताही आवाज ऐकू येत नव्हता.

White House: अमेरिकेच्या व्हाइट हाऊस येथे झालेल्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमात एक वेगळीच घटना घडली आणि सगळ्यांचं लक्ष एका लहान मुलाकडे गेलं. त्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप बैठक घेत होते. पण कार्यक्रमात उपस्थित असलेला दोन वर्षांचा ट्रॅविस स्मिथ अचानक फर्शीवर खेळता-खेळता झोपून गेला आणि त्याच्या निरागस वागण्याने सगळ्यांची मने जिंकली.
ट्रॅविस स्मिथ हा साधा मुलगा नाही. त्याची कहाणी खूप प्रेरणादायी आहे. तो जन्मतःच पूर्णपणे बहिरा होता. त्याला कोणताही आवाज ऐकू येत नव्हता. त्याची आई सिएरा स्मिथ सांगते की, ती त्याला नावाने हाक मारायची, पण तो प्रतिसाद देत नसे. ‘आय लव्ह यू’ म्हटलं तरी त्याला काहीच समजत नसे. त्यामुळे आईसाठी हा खूप भावनिक आणि कठीण अनुभव होता.
यानंतर ट्रॅविसवर एका नव्या प्रकारच्या जीन थेरपीद्वारे उपचार करण्यात आले. ही थेरपी रेजेनेरॉन या कंपनीने विकसित केली आहे आणि तिला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मान्यता दिली आहे. या उपचारासोबतच त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. उपचारानंतर हळूहळू ट्रॅविसची ऐकण्याची क्षमता परत येऊ लागली.
“He didn’t know his name. He couldn’t hear me tell him how much I love him — and now, with @Regeneron, and this amazing surgery, he can listen to music… now he can hear…”@POTUS: “That’s incredible… that’s a beautiful boy.” ❤️ https://t.co/9oWgwHQX0N pic.twitter.com/C7WbftQ3B8
— Rapid Response 47 (@RapidResponse47) April 23, 2026
आज ट्रॅविस आपल्या आईचा आवाज ओळखू शकतो, गाणी ऐकू शकतो आणि संगीताचा आनंदही घेतो. त्याला म्युझिक खूप आवडू लागलं आहे. तो गाणी ऐकतो, त्यावर नाचतो आणि म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्ससोबत खेळतो. त्याची आई सांगते की, त्याने उपचारादरम्यान खूप धैर्य दाखवलं.
त्या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रंप यांनी स्वतः ट्रॅविस आणि त्याच्या आईशी संवाद साधला. त्यांनी आश्चर्य व्यक्त करत विचारलं की, तो आधी काहीच ऐकू शकत नव्हता का? त्यावर आईने सांगितलं की, तो पूर्णपणे बहिरा होता, पण आता तो ऐकू शकतो आणि समजूही शकतो.
कार्यक्रमादरम्यान ट्रॅविस आपल्या आईच्या कुशीत खेळत होता, हसत होता आणि अचानक खाली उतरून कार्पेटवर झोपला. कधी तो रांगत होता, तर कधी उलटा झोपून खेळत होता. त्याच्या या गोंडस आणि निरागस हालचालींनी संपूर्ण वातावरण हलकं आणि आनंदी केलं.
हा कार्यक्रम औषधांच्या किमती कमी करण्याबाबत आयोजित करण्यात आला होता. सरकार आणि रेजेनेरॉन यांच्यात काही औषधांचे दर कमी करण्यासाठी करार झाला आहे. या बैठकीत इराणशी संबंधित मुद्दे आणि वॉशिंग्टन डीसीच्या विकासाबाबतही चर्चा झाली. मात्र, या सर्व चर्चेपेक्षा ट्रॅविसची कथा आणि त्याची उपस्थितीच सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली.
एकूणच, एका छोट्या मुलाने आपल्या निरागस वागण्याने आणि प्रेरणादायी प्रवासाने मोठ्या कार्यक्रमातही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.





