US Iran War: अमेरिका इराणवर अणुहल्ला करणार का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर व्हाईट हाऊसने केले स्पष्ट
US Iran War: वेंस यांच्या या विधानानंतर अमेरिका इराणवर परमाणु हल्ला करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला. यावर स्पष्टीकरण देताना व्हाईट हाऊसने सांगितले की उपराष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यात कुठेही परमाणु हल्ल्याचा संकेत नाही.

US Iran War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला दिलेल्या ताज्या धमकीनंतर जगभरात खळबळ उडाली आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊसने स्पष्ट केले की इराणवर परमाणु (न्यूक्लियर) हल्ला करण्याचा कोणताही विचार सध्या करण्यात आलेला नाही.
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वेंस (J. D. Vance) यांनी याआधी म्हटले होते की, अमेरिकेकडे अशी काही शक्तिशाली साधने (हत्यारे) आहेत, ज्यांचा वापर अद्याप करण्यात आलेला नाही. राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या कडक अल्टिमेटमची अंमलबजावणी करण्यासाठी ही साधने वापरण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही त्यांनी सूचित केले होते.
वेंस यांच्या या विधानानंतर अमेरिका इराणवर परमाणु हल्ला करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला. यावर स्पष्टीकरण देताना व्हाईट हाऊसने सांगितले की उपराष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यात कुठेही परमाणु हल्ल्याचा संकेत नाही.
दरम्यान, ट्रम्प यांनी इराणसाठी डेडलाइन निश्चित करत इशारा दिला होता की ठराविक वेळेत अमेरिका-इराण करार झाला नाही, तर कारवाई कधीही होऊ शकते. ही कारवाई मंगळवारी रात्रीही होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, इराणचे नेतृत्व चर्चा करत असले तरी अंतिम करार होईल की नाही, याबाबत अनिश्चितता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दुसरीकडे, इराणने तात्पुरत्या युद्धविरामाचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलनेही इराणवर दबाव वाढवला आहे. इस्रायली सैन्याने इराणमधील नागरिकांना रेल्वे सेवांपासून दूर राहण्याचा इशारा दिला. त्यानंतर काही तासांतच उत्तर-पश्चिम इराणमध्ये तब्रीज-जंजान महामार्गावरील पूल, याह्या अबाद रेल्वे पूल तसेच खार्ग बेटावरील ठिकाणांवर हल्ले करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे मध्य पूर्वेत परिस्थिती अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





