सविंदणेत शेळीवर हल्ला करुन जाताना बिबट्या पडला विहिरीत

शिरूर : सविंदणे (ता. शिरूर) येथील नाथनगर येथे गोठ्यातील शेळीवर हल्ला करून तिला घेऊन जात असताना जवळील विहिरीचा अंदाज न आल्याने बिबट्या थेट विहिरीत कोसळला. ही घटना मंगळवारी (दि. १८) रोजी पहाटेच्या सुमारास घडली. त्यांनतर वनविभागाच्या रेस्क्यू टिमने शर्थीचे प्रयत्न करत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले.
नाथनगर येथे प्रभू सावळेराम नरवडे यांच्या गोठ्यातील शेळीवर बिबट्याने हल्ला केला. शेळीला घेऊन जात असताना तेथील विहिरीच्या रिंगचा अंदाज न आल्याने त्यावरून उडी मारताना तो थेट शेळीला घेऊन विहिरीत कोसळला. शेळ्यांच्या ओरडण्याचा व विहिरीतून बिबट्याचा आवाज ऐकू आल्याने शेजारील शेडमध्ये झोपलेल्या व्यक्तीला जाग आली. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना बिबट्या शेळीला घेऊन विहिरीत पडल्याचे दिसून आले. या घटनेत शेळी ठार झाली.
नागरिकांनी या घटनेची माहिती शिरुर वनविभागाचे नियतक्षेत्र अधिकारी नारायण राठोड यांना दिली. वनपरीमंडल अधिकारी भानूदास शिंदे, नियतक्षेत्र अधिकारी नारायण राठोड, वन कर्मचारी हनुमंत कारकुड हे रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिक व ग्रामस्थांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करत बिबट्याला पिंजराच्या सहाय्याने सुरक्षित विहिरीतून बाहेर काढत जीवदान दिले.





