Manoj Jarange : ‘परवानगी मिळो अथवा न मिळो, मुंबईला जाणार’; अखेर मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा
Manoj Jarange : २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी हे आंदोलन निर्णायक असल्याचं यापूर्वीच स्पष्ट केलं होतं.

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या उपोषणाचा आज १४ वा दिवस आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी मोठी घोषणा केली आहे. उद्या १२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत मुंबई मोर्चाची दिशा निश्चित केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी हे आंदोलन निर्णायक असल्याचं यापूर्वीच स्पष्ट केलं होतं. राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही, तर मुंबईकडे मोर्चा वळवण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. आता त्यांनी मुंबईला जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.
‘मुंबईला गेल्याशिवाय न्याय मिळत नाही’
मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना मुंबईला जाण्यासाठी तयार राहण्याचं आवाहन केलं आहे. “मुंबईला गेल्याशिवाय न्याय मिळत नाही. सरकारला भरपूर वेळ दिला, पण सरकारने ऐकलं नाही. मराठा समाजावर अन्याय सुरू आहे. परवानगी मिळो अथवा न मिळो, पण मुंबईला जाणार,” अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.
“सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. आपल्याला मुंबईला जायचंच आहे. मुंबईला जाणाऱ्या वाटेवर येऊन थांबा. जो मार्ग ठरेल, त्याच मार्गाने मुंबईला जायचं,” असं आवाहनही त्यांनी मराठा समाजाला केलं.
‘ज्यांना शक्य नाही त्यांनी गावातूनच पाठिंबा द्यावा’
मुंबई मोर्चासाठी आर्थिक अडचणी असलेल्या मराठा बांधवांनी सहभागी होण्याची आवश्यकता नसल्याचंही जरांगे यांनी स्पष्ट केलं. “ज्यांना पैशांची अडचण असेल त्यांनी येऊ नये. त्यांनी आम्हाला शांततेत गावातच पाठिंबा द्यावा. समाजाची हार होऊ देऊ नका. मुंबईत येऊ शकत नसाल, तर इथूनच पाठिंबा द्या,” असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, मुंबईत आंदोलनादरम्यान अडचणी निर्माण झाल्यास राज्यभरातून आंदोलन करण्याचं आवाहनही जरांगे यांनी केलं आहे. “मुंबईत आम्हाला त्रास झाला तर जागोजागी रस्ते अडवून ठेवा,” असं ते म्हणाले.
‘परवानगी दिली नाही, तरी मुंबईला जाणार’
यावेळी जरांगे यांनी सरकारला थेट इशारा दिला. मागील आंदोलनाच्या वेळी मुंबई मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, यावेळी परवानगी मिळो अथवा न मिळो, मुंबईला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
“मागच्या वेळी परवानगी नाकारली, यावेळी ते नाकारणार नाहीत. परवानगी दिली आणि नाही दिली तरी मुंबईला जाणार,” असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
त्यामुळे आता १२ सप्टेंबरच्या बैठकीत मुंबई मोर्चाबाबत नेमका कोणता निर्णय घेतला जातो आणि मराठा आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
First Aid: बेशुद्ध व्यक्तीला पाणी पाजावं का? चुकून केलेली ‘ही’ गोष्ट ठरू शकते धोकादायक!






