जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले…

Jammu and Kashmir Assembly Election | लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यातच आता जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीबाबत केंद्रीयमंत्री जी किशन रेड्डी यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे.
सप्टेंबर महिन्यात जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणूक होणार असल्याचे रेड्डी यांनी सांगितले आहे. केंद्रीयमंत्री जी किशन रेड्डी यांना भाजपने जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. यानिमित्त एका रॅलीला संबोधित करताना त्यांनी हे विधान केले आहे.
भाजपला मतदान करण्याचे जी किशन रेड्डी यांचे आवाहन
सोमवारी जम्मूच्या बाहरीमध्ये एका रॅलीला संबोधित करताना केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी जम्मू-काश्मीरमधील विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी आणि दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी निवडणुकीत भाजपला मतदान करण्याचे आवाहन केलं. तसंच. कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान आणि गुप्तचर संस्था आयएसआयच्या कारवायांना मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. विधानसभा निवडणूक सप्टेंबरमध्ये होईल आणि आम्हाला विश्वास आहे की पूर्ण बहुमताने लोक भाजपला सत्तेत बसवतील,”असंही केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितले आहे.
विधानसभा निवडणूक 2014मध्ये झाली होती
मागील वेळेस जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक 2014मध्ये झाली होती. 19 जून 2018 रोजी भाजपकडून पाठिंबा काढून घेतल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्री पदावरून राजीनामा दिला होता आणि त्यानंतर राज्यात राज्यपाल राजवट लागू झाली होती, तसेच पुढे जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटही लागू करण्यात आली.
यानंतर 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारनं कलम ३७० आणि ३५ अ हटवले आणि जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवलं गेलं. याचबरोबर लडाखला जम्मू-काश्मीरपासून वेगळं करण्यात आलं होतं. तेव्हापासून उपराज्यपाल जम्मू आणि काश्मीर राज्याचा कारभार सांभाळत आहे. यातच विधानसभेच्या निवडणूकीबाबत केंद्रीयमंत्री जी किशन रेड्डी यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे.
हेही वाचा:





