Satara: व्यापारी पेठांतील अतिक्रमण हटविण्याचे आव्हान; सातारा पालिका ॲक्शन मोडमध्ये
Satara अतिक्रमण हटाव मोहिमेचा खरा कस व्यापारी पेठांमधील कारवाईत लागणार आहे.

Satara: समर्थ मंदिर चौक आणि राधिका रस्ता (माजी राज्यपाल गणपतराव तपासे पथ) परिसरातील अतिक्रमणांवर सातारा पालिकेने नुकतीच धडाकेबाज कारवाई करत अनेक अनधिकृत बांधकामे हटविली. या कारवाईमुळे शहरात अतिक्रमणाविरोधात कठोर भूमिका घेतल्याचा संदेश गेला असला, तरी आता शहरातील प्रमुख व्यापारी पेठांमधील अतिक्रमणांवरही तितक्याच कठोरतेने कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरु लागली असून ही कारवाई करण्याचे आव्हान पालिकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांसमोर आहे.
कोणताही राजकीय दबाव न जुमानता समर्थ मंदिर परिसरात कारवाई करण्यात आल्याचा दावा पालिका वर्तुळातून केला जात आहे. मात्र, शहरातील सर्वाधिक वर्दळीचे मार्ग असलेल्या राजपथ, भवानी पेठ, सदाशिव पेठ, संत नामदेव महाराज पथ, मोती चौक, गोलबाग, प्रतापगंज पेठ आणि शनिवार चौक (५०१ पाटी) परिसरातील अतिक्रमणांबाबतही अशीच भूमिका घेतली जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील अनेक व्यापारी इमारतींमध्ये पार्किंगची अपुरी व्यवस्था, पालिकेच्या खुल्या जागेवरील अतिक्रमणे, पार्किंगच्या जागेवर उभारलेले गाळे आणि नियमबाह्य बांधकामांमुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. काही ठिकाणी सार्वजनिक जागा आणि रस्त्यालगतची मोकळी जागा खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे वापरली जात असल्याचीही तक्रार नागरिक करत आहेत.
मोती चौक ते शनिवार चौक दरम्यान फेरीविक्रेत्यांवर काही काळ नियंत्रण आणण्यात आले होते. मात्र, कारवाईची धार कमी होताच अनेक विक्रेत्यांनी पुन्हा रस्त्यांवर ठाण मांडल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी पादचारी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
खरी कारवाई पूर्ण होण्याची गरज
अतिक्रमण हटाव मोहिमेचा खरा कस व्यापारी पेठांमधील कारवाईत लागणार आहे. राजपथ आणि कर्मवीरभाऊराव पाटील पथ या प्रमुख मार्गांचे सुधारित विकास आराखड्यानुसार भूमापन करून रस्त्याच्या हद्दीत येणारी सर्व अतिक्रमणे हटविण्याची गरज व्यक्त होत आहे. नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ॲड. दत्ता बनकर आणि पालिका प्रशासनाने कोणत्याही राजकीय किंवा व्यापारी दबावाला बळी न पडता शहरभर एकसमान निकषांवर अतिक्रमणविरोधी कारवाई राबवावी, अशी मागणी होत आहे. समर्थ मंदिर चौकातील कारवाईने सुरुवात झाली असली, तरी व्यापारी पेठांमधील अतिक्रमणांवर बुलडोझर चालल्याशिवाय पालिकेची खरी कारवाई पूर्ण होणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.





