आरएसएसला १०० वर्ष पूर्ण होताच भारत हिंदू राष्ट्र घोषित होईल – भाजप आमदार

नवी दिल्ली – रामाच्या रूपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि हनुमानाच्या रूपात युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारताच्या लोकशाही व्यवस्थेत अवतार घेतला आहे, असे वक्तव्य भाजप आमदाराने केले आहे. एवढेच नव्हे तर २०२४ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघास (आरएसएस) १०० वर्ष पूर्ण होत आहे. आरएसएस १०० वर्ष पूर्ण करताच भारत हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होईल, अशी भविष्यवाणी उत्तरप्रदेशस्थित बालिया जिल्ह्यातील आमदार सुरेंद्र सिंह यांनी केली आहे. एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना ते संबोधित करत होते.
विरोधकांवर टीका करताना सुरेंद्र सिंह यांनी अखिलेश यादव यांना चोर तर मायावतींना स्वार्थी म्हंटले. येथेच न थांबता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कलियुगातील राक्षसाची उपमा दिली. ते म्हणाले, माणसाच्या रूपात ममता बॅनर्जी राक्षसीण आहेत. लंकेमध्ये लंकिनीने हनुमानाला थांबविले होते. त्याचप्रकारे ममता मोदी-योगी सारख्या राम आणि हनुमान यांना पश्चिम बंगालमध्ये येण्यापासून रोखत आहे. बंगालमध्ये भाजप बिभीषणचा शोध घेत आहे. तृणमूल काँग्रेसचे १०-२० बिभीषण भाजपला मिळाले आहेत. त्यामधील खरा बिभीषणचा शोधला जाईल आणि मोदी त्याचा राज्यभिषेक करतील, असेही सुरेंद्र सिंह यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, सुरेंद्र सिंह यांनी याआधीही अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. यामुळे त्यांना अडचणींचा सामनाही करावा लागला होता.





