Mohammed Siraj : ‘बस करा!’ चाहत्यांच्या घोषणाबाजीवर संतापला सिराज; गौतम गंभीरसाठी राहिला उभा, पाहा VIDEO

Mohammed Siraj Video Viral : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मायदेशात खेळली गेलेली दोन सामन्यांची कसोटी मालिका भारतीय संघ आणि त्यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट स्वप्न ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताला नुसते मोठ्या फरकाने हरवलेच नाही, तर २-० अशा फरकाने क्लीन स्वीप करत नामुष्की ओढवली. २०२४ मध्ये न्यूझीलंड आणि आता २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत क्लीन स्वीप करण्याची ही दुसरी वेळ आहे. या सामन्यानंतर गंभीर आणि सिराज यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
गौतम गंभीर यांच्याविरोधात ‘हाय हाय’च्या घोषणा –
गुवाहाटी कसोटीत भारताचा ४०८ धावांनी दारुण पराभव झाला, जो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील धावांच्या फरकाने झालेला भारताचा सर्वात मोठा पराभव ठरला. या मानहानिकारक पराभवानंतर चाहत्यांचा संताप शिगेला पोहोचला होता. सामन्यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मैदानात भारतीय खेळाडू आणि कोचिंग स्टाफचे सदस्य उपस्थित असतानाच, काही चाहते संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत असल्याचे दिसत आहेत.
सिराजने घेतली गंभीर यांची बाजू –
Crowd shouting “Gautam Gambhir hay hay!” 😬
Man this is peak embarrassment. 😭
— Rohan💫 (@rohann__45) November 26, 2025
जेव्हा गंभीर यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू झाली, तेव्हा मैदानात उपस्थित असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने थेट आपल्या मुख्य प्रशिक्षकासाठी बाजू घेतली. सिराजने त्वरित आपल्या तोंडावर बोट ठेवत चाहत्यांना शांत राहण्याची विनंती केली. सिराजची ही कृती लगेचच व्हायरल झाली आणि चर्चेचा विषय ठरली आहे.
गंभीर यांच्या प्रशिक्षणाखालील भारतीय संघाचे खराब प्रदर्शन –
गौतम गंभीर यांनी मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारल्यापासून भारतीय संघाने आतापर्यंत एकूण १९ कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी भारताला केवळ ७ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे, तर त्यांना तब्बल १० सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धचे २ सामने ड्रॉ राहिले. कसोटीतील या खराब कामगिरीमुळे बीसीसीआय गंभीर यांच्या भविष्याबद्दल काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





