राऊत यांच्यावरील ईडी कारवाईवर विचारताच अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

परळी – शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील मैत्री निवासस्थानी ईडीने धाड मारली आहे. जवळपास चार तासांपासून ईडीचे अधिकारी राऊत यांच्या निवासस्थानी ठाण मांडून बसले आहेत. राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे. राऊत यांच्यावर ईडीची कारवाई सुरु असल्याचे कळताच शिवसैनिक मोठ्या संख्येने त्यांच्या मैत्री बंगल्याबाहेर जमले आहेत. राऊत यांच्यावर सुरु असलेल्या कारवाईवर आता राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. भाजप व शिंदे गटाचे नेते राऊतांवरील कारवाईचे समर्थन करताना दिसतायेत. तर शिवसेना व महाविकास आघाडीतील नेत्यांनी ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. अशातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार हे आज परळी दौऱ्यावर असून यावेळी पत्रकारांनी त्यांना राऊत यांच्यावरील कारवाईबाबत विचारले असता त्यांनी याबाबत भाष्य केले आहे. ‘एखाद्याने जर चूक केली असेल तर त्या व्यक्तीचा पक्ष, जात, धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. मात्र कारवाई करत असताना त्या राजकीय हेतून प्रेरित नसाव्यात.’ असं अजित पवार म्हणाले. राऊत यांच्यावरील कारवाईची माहिती माध्यमांमधून समजली, आपलं राऊत यांच्याशी याबाबत बोलणं झालं नाही असं देखील पवार यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राऊत यांच्यावरील ईडी कारवाईबाबत भाष्य करताना अजित पवार यांनी शिवसेनेला सर्वात कमी निधी दिल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार केला. पतंत्रकारांनी याबाबत पवार यांना विचारले असता, अशा लोकांच्या आरोपांना मी उत्तर देण्याची आवश्यकता नाही. देशावर करोना महामारीचे संकट असताना सत्ताधारी गटातील सर्व पक्षीय आमदारांना योग्य पद्धतीने निधी वाटपाचा प्रयत्न केल्याचं देखील पवार यांनी सांगितले.
भाजपने राज्यपालांचा राजीनामा वाचवला – मिटकरी
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या कारवाईमागे राज्यपालांचा राजीनामा वाचवण्याचा डाव असल्याचा दावा केला आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात बोलताना, ‘महाराष्ट्रातून, विशेष करून मुंबई, ठाण्यातून गुजराती, राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास येथे पैसेच शिल्लक राहणार नाहीत.’ असं वादग्रस्त विधान केलं होत. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. मात्र आज सकाळीच राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे माध्यमांमध्ये सर्वत्र याचेच वार्तांकन सुरु आहे. मिटकरी यांनी नेमका हाच मुद्दा अधोरेखित करत हे राज्यपालांचा राजीनामा वाचवण्याचे षडयंत्र असल्याचे म्हंटले आहे.
…त्यांनी शरद पवार यांची शपथ घ्यावी
दरम्यान, राऊत यांच्यावर सुरु असलेल्या या कारवाईचे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट व रामदास कदम यांनी जोरदार स्वागत केले आहे. राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊ नये, त्यांनी शरद पवार यांची शपथ घ्यावी असा खोचक टोला शिरसाट व कदम यांनी राऊतांना लगावला आहे.





