राज्यभरात ट्रकचालकांचा चक्का जाम; भंडारा आगाराच्या 250 बस फेऱ्या रद्द !

मुंबई – केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याला सर्वत्र मोठ्या प्रमाणात विरोध होताना पाहायला मिळत आहे. राज्यभरात आज सकाळपासून ठिकठिकाणी ट्रकचालक रस्त्यावर उतरून आंदोलन करतांना पाहायला मिळत आहे.
कुठे चक्का जाम केला जात आहे, तर कुठे टायर पेटवले जात आहे. त्यामुळे अनेक महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने याचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे.
ट्रक चालकांनी नागपूर – कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर नागपूर जिल्ह्यात बंद पुकारला आहे. आज सकाळपासून सुरू असलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भंडारा आगारातून जवळ जवळ 250 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे. या बस फेऱ्या रद्द झाल्याने सुमारे सात लाखांचा फटका भंडारा आगाराला बसला असून यात प्रवाशांचीही मोठी गैरसोय होत आहे.
याच अनुषंगाने गोंदिया शहरातील कुडवा चौक येथे आज नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच टायर जाळून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी रामनगर पोलिसांनी 13 चालकांना ताब्यात घेतले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात देखील ट्रक चालक आक्रमक होताना पाहायला मिळाले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मलकापूर-घोडसगाव नजिक रस्त्यावर टायर जाळून महामार्ग अडवण्यात आला आहे. गेल्या एक तासांपासून महामार्ग अडवून वाहन चालकांची घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.





