EPFOचे WhatsApp चॅनेल सुरू; पीएफशी संबंधित अपडेट्स आता थेट मोबाईलवर, असे करा जॉइन
EPFO WhatsApp : EPFO खातेदारांना WhatsAppवर पीएफ बॅलन्स, योगदान आणि क्लेम स्टेटस तपासता येणार आहे. ही सुविधा कशी वापरायची आणि काय काळजी घ्यायची जाणून घ्या.

EPFO WhatsApp : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ आणि ईएलआयएस सदस्यांसाठी अधिकृत WhatsApp चॅनेल सुरू केले आहे. या चॅनेलवर पीएफशी संबंधित विविध सेवा, योजना आणि महत्त्वाच्या घडामोडींची माहिती मिळणार आहे. तसेच पीएफशी संबंधित प्रक्रिया समजून घेण्यासाठी शैक्षणिक व्हिडीओ आणि उपयुक्त लिंकही उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
या माध्यमातून पीएफमधून आगाऊ रक्कम काढणे, नोकरी पुन्हा सुरू केल्यानंतर पीएफमधील योगदान आणि ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजने’तील देयक प्रक्रियेबाबत माहिती दिली जात आहे.
EPFOचे WhatsApp चॅनेल कसे जॉइन कराल?
EPFOच्या अधिकृत WhatsApp चॅनेलवर जाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि Follow पर्याय निवडा.
EPFमधून आगाऊ रक्कम काढण्याचे नवे नियम –
EPFOच्या नव्या नियमांनुसार सदस्यांना विविध कारणांसाठी पीएफमधून आगाऊ रक्कम काढता येते. काही परिस्थितींमध्ये एकूण जमा रकमेपैकी 75 टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याची तरतूद आहे. मात्र, यासाठी संबंधित नियम आणि अटी लागू राहतील.
EPF आगाऊ रक्कम काढण्याचे नियम मुख्यतः आवश्यक गरजा, घराशी संबंधित गरजा आणि विशेष परिस्थिती अशा प्रकारे विभागले आहेत.
1. आजारपणासाठी : मर्यादा नाही
स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या आजारपणासाठी EPFमधून आगाऊ रक्कम घेता येते. या कारणासाठी आगाऊ रक्कम घेण्याच्या संख्येवर मर्यादा नाही.
2. शिक्षणासाठी : 10 वेळा
स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या शिक्षणासाठी EPFमधून आगाऊ रक्कम घेता येते. सदस्यत्वाच्या कालावधीत जास्तीत जास्त 10 वेळा ही सुविधा घेता येते.
3. विवाहासाठी : 5 वेळा
स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्याचा विवाह असल्यास EPFमधून आगाऊ रक्कम काढता येते. या कारणासाठी सदस्यत्वाच्या कालावधीत जास्तीत जास्त पाच वेळा रक्कम काढता येते.
4. घरासाठी : 5 वेळा
घराशी संबंधित गरजांसाठीही EPFमधून आगाऊ रक्कम घेता येते. यामध्ये घर किंवा जागा खरेदी करणे, घर बांधणे, गृहकर्जाची परतफेड तसेच घराची दुरुस्ती, बदल किंवा सुधारणा यांचा समावेश आहे. या कारणांसाठी जास्तीत जास्त पाच वेळा आगाऊ रक्कम घेता येते.
5. विशेष परिस्थितीत : वर्षातून 2 वेळा
केंद्रीय मंडळ किंवा EPFOने अधिसूचित केलेल्या विशेष परिस्थितीत सदस्यांना आर्थिक वर्षात जास्तीत जास्त दोन वेळा आगाऊ रक्कम घेता येते.
25 टक्के रक्कम खात्यात ठेवणे आवश्यक
EPFमधून रक्कम काढल्यानंतर सदस्याच्या खात्यात एकूण जमा योगदानाच्या किमान 25 टक्के रक्कम शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. यामध्ये कर्मचारी आणि नियोक्त्याचे योगदान तसेच त्यावर मिळालेले व्याज यांचा समावेश होतो.
म्हणजेच, खात्यातील एकूण पात्र रकमेपैकी 25 टक्के रक्कम शिल्लक ठेवून उर्वरित रक्कम नियमांनुसार काढता येईल. आगाऊ रक्कम घेण्यापूर्वी कोणत्या कारणासाठी पैसे काढायचे आहेत, हे तपासणे महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येक कारणासाठी रक्कम काढण्याची मर्यादा वेगळी आहे.




