Jio IPO : जिओ 30,213 कोटी रुपये उभारून नेमकं काय करणार? आकाश अंबानींनी सांगितला प्लॅन
Jio IPO : जिओ प्लॅटफॉर्म्सचा IPO 21 ऑक्टोबरला खुला होणार आहे. कंपनी 30,213 कोटी रुपये उभारणार असून कर्जफेडीसह AI, 6G आणि डिजिटल सेवांवर भर देणार आहे.

Jio IPO : रिलायन्स जिओची कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा आयपीओ 21 ऑक्टोबरला खुला होणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी तब्बल 30,213 कोटी रुपये उभारणार आहे. या पैशांचा वापर कंपनी कर्ज फेडण्यासाठी करणार आहे. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), क्लाउड कॉम्प्युटिंग, 6जी आणि भारतीय भाषांमधील डिजिटल सेवांवरही जिओचा भर राहणार आहे.
जिओ प्लॅटफॉर्म्सचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी आयपीओपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कंपनीच्या भविष्यातील योजनांची माहिती दिली. भारताची डिजिटल अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून, आर्थिक वर्ष 2030-31 पर्यंत ती 1.4 लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचू शकते, असे त्यांनी सांगितले. या वाढीमध्ये जिओला मोठी भूमिका बजावायची आहे. देशातील प्रत्येक घर, नागरिक आणि व्यवसायापर्यंत स्वस्त आणि चांगल्या डिजिटल सेवा पोहोचवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असल्याचे अंबानी म्हणाले.
आयपीओतून मिळणारा पैसा कर्ज फेडण्यासाठी
जिओ प्लॅटफॉर्म्स आयपीओतून मिळणारी संपूर्ण रक्कम कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे. कंपनीला आपले निव्वळ कर्ज शून्यावर आणायचे आहे.
आयपीओसाठी कंपनीने प्रति शेअर 1,065 ते 1,119 रुपये असा किंमत पट्टा निश्चित केला आहे. 1,119 रुपये या उच्च किंमतीनुसार कंपनी सुमारे 30,213 कोटी रुपये उभारेल. या किंमतीनुसार जिओ प्लॅटफॉर्म्सचे एकूण बाजारमूल्य सुमारे 10.3 लाख कोटी रुपये म्हणजेच 108.3 अब्ज डॉलर होईल.
या आयपीओमध्ये कंपनी 27 कोटी नवीन शेअर्स जारी करणार आहे. विद्यमान भागधारक आपले शेअर्स विकणार नाहीत. त्यामुळे आयपीओतून मिळणारा पैसा थेट कंपनीला मिळणार आहे.
जिओला केवळ टेलिकॉम कंपनी राहायचे नाही
जिओ भविष्यात केवळ मोबाइल आणि इंटरनेट सेवा देणारी कंपनी राहणार नाही. एआय, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि इतर डिजिटल सेवांमध्ये व्यवसाय वाढवण्याची कंपनीची तयारी आहे.
आकाश अंबानी यांच्या म्हणण्यानुसार, जिओकडील प्रति जीबी डेटाची किंमत जगातील सर्वात कमी किंमतींपैकी आहे. भारतात वापरल्या जाणाऱ्या एकूण मोबाइल डेटापैकी 60 टक्क्यांहून अधिक डेटा जिओच्या नेटवर्कवरून जातो, असा दावाही त्यांनी केला.
कंपनीने तंत्रज्ञानासाठी स्वतःच्या प्रणाली विकसित करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगल्या सेवा देण्याबरोबरच बाहेरील कंपन्यांच्या तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होत असल्याचे अंबानी यांनी सांगितले.
6जी आणि एआयवर मोठी तयारी
जिओने आता 6जी तंत्रज्ञानासाठी तयारी सुरू केली आहे. सध्याच्या नेटवर्कमध्ये सॉफ्टवेअर अपग्रेड करून 6जी सेवा सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. त्यामुळे पूर्णपणे नवीन नेटवर्क उभारण्याची गरज कमी होऊ शकते.
भारतीय भाषांमध्ये एआय सेवा उपलब्ध करून देण्यावरही कंपनीचा भर आहे. 12 भारतीय भाषांमध्ये फोनवरील संभाषणाचा सारांश तयार करणे आणि बोललेले शब्द लिखित स्वरूपात बदलणे अशा सुविधा देण्याची योजना आहे.
या एआय सेवा जिओच्या सुमारे 53 कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.
7,220 पेटंटसाठी अर्ज
आकाश अंबानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिओ प्लॅटफॉर्म्सने भारत आणि परदेशात एकूण 7,220 पेटंटसाठी अर्ज केले आहेत. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या (WIPO) 2025 मधील पेटंट सहयोग कराराच्या क्रमवारीत जगातील टॉप 20 अर्जदारांमध्ये स्थान मिळवणारी जिओ ही एकमेव भारतीय कंपनी असल्याचा दावा त्यांनी केला.
जिओमध्ये 12 हजारांहून अधिक इंजिनिअर्स तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी काम करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
जिओ IPO मध्ये किती पैसे लागतील?
जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओमध्ये एका लॉटमध्ये 12 शेअर्स असतील. 1,119 रुपये या उच्च किंमतीनुसार एका लॉटसाठी किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 13,428 रुपये गुंतवावे लागतील.
यानंतर 12 शेअर्सच्या पटीत अर्ज करता येईल. कंपनीने पात्र कर्मचाऱ्यांसाठी 500 कोटी रुपये आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पात्र भागधारकांसाठी 2,500 कोटी रुपयांचे शेअर्स राखून ठेवले आहेत. कर्मचाऱ्यांना प्रति शेअर 54 रुपयांची सवलत मिळणार आहे.
जिओ प्लॅटफॉर्म्सने गुजरातमधील रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे आयपीओसाठी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसही दाखल केला आहे.





