Whatsapp News : ‘यूझरनेम’ फिचरमुळे सायबर क्राइमचा धोका; केंद्राची मेटा कंपनीला नोटीस
व्हॉट्सअॅप याला प्रायव्हसी म्हणत असले तरी अनेक टेक तज्ज्ञांनी गंभीर चिंता व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

Whatsapp News – सोशल मीडिया क्षेत्रात व्हॉट्सअॅप लवकरच एक नवीन आणि महत्त्वपूर्ण फिचर आणण्याच्या तयारीत आहे. या फिचरमुळे सायबर क्राइम आणि ऑनलाईन फसवणूक वाढण्याची भीती केंद्र सरकारने व्यक्त केली आहे.
तसेच केंद्र सरकार व्हॉट्सअॅपच्या या आगामी युझर आयडी फिचरची सखोल तपासणी करणार असून व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी मेटाला या संदर्भात नोटीस बजावली आहे. या मुद्द्यावरील चर्चा पूर्ण होईपर्यंत व्हॉट्सॲपचे युझरनेमची वैशिष्ट्य सादर न करण्याचे आदेश देत ३ दिवसांत सविस्तर स्पष्टीकरण मागविले आहे.
सरकारी सूत्रांनी सांगितले की, या वैशिष्ट्यामुळे वापरकर्ते अधिकृत संस्था, संघटना किंवा व्यक्तींशी मिळतेजुळते युझरनेम वापरू शकतील. ज्यामुळे इम्पर्सनेशन आणि फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. याचा परिणामी सार्वजनिक सुरक्षा आणि समाजावर विपरीत परिणाम होऊ शकतो. राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक सुरक्षेबाबत सरकार कोणतीही तडजोड करणार नाही, असे त्यांनी सांगितले.
या फिचरमुळे कोणताही धोका निर्माण होणार नाही याची खात्री सरकारला करावी लागेल. या फिचरवर निर्बंध घालण्यासाठी काही कायदेशीर तरतुदी आहेत का, याची तपासणी अधिकारी करतील, असे सूत्रांनी सांगितले. तसेच जर व्हॉट्सॲपचा प्रतिसाद असमाधानकारक आढळला, तर सरकार या वैशिष्ट्याची अंमलबजावणी रोखण्याचा प्रयत्न करू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, मेटा कंपनीच्या दाव्यानुसार, हे फिचर युजर्सच्या फोन नंबरची गोपनीयता जपण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. सध्याच्या सुविधेत, जर एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे किंवा व्यवसाय करणाऱ्या कंपनीकडे तुमचा मोबाईल नंबर असेल, तर ते थेट तुमच्याशी संपर्क साधू शकतात.
नवीन फिचर आल्यानंतर जगातील ३ अब्जाहून अधिक व्हॉट्सअॅप युजर्स आपला फोन नंबर शेअर न करताही एकमेकांशी संवाद साधू शकतील. सुरक्षेसाठी व्हॉट्सअॅप युजर्सना युनिक युझरनेम सुचवणारे युझरनेम जनरेटर टूल देखील देणार आहे.
तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता
व्हॉट्सअॅप याला प्रायव्हसी म्हणत असले तरी अनेक टेक तज्ज्ञांनी गंभीर चिंता व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. टेलिग्राम या मेसेजिंग अॅपचे उदाहरण देत तज्ज्ञांनी म्हटले आहे की, फोन नंबर नसल्यामुळे सायबर गुन्हेगारांना ओळख लपवणे अधिक सोपे होईल. तसेच मोबाईल नंबर नसल्यामुळे तपास यंत्रणांना सायबर गुन्ह्यांचा छडा लावणे कठीण होईल.
अलीकडेच नीट-यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा पेपर लीक झाल्याच्या प्रकरणात टेलिग्राम अॅपचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचे समोर आले होते. टेलिग्रामवरही युझरनेमच्या आधारे ओळख लपवता येत असल्याने तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.





