US-Israel Iran War: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यातील राजनैतिक संबंधांबाबत एक मोठी आणि संभ्रम निर्माण करणारी बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (२३ मार्च) दावा केला की, दोन्ही देशांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून ‘अत्यंत सकारात्मक’ चर्चा सुरू आहे. मात्र, इराणने हा दावा फेटाळून लावत अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांचा दावा: “इराणला करार हवा आहे” ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी सांगितले की, दोन्ही देशांमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये ‘वेरी स्ट्रॉन्ग’ चर्चा सुरू असून त्यात मोठे यश मिळत आहे. चर्चेसाठी पोषक वातावरण निर्मितीसाठी अमेरिकेने इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ले पाच दिवसांसाठी थांबवले आहेत. इराणला सध्या हा संघर्ष संपवून करार करण्याची तीव्र इच्छा असल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले. अमेरिकेच्या प्रमुख अटी काय? ट्रम्प यांनी वॉशिंग्टनच्या प्रमुख उद्दिष्टांवर स्पष्ट भाष्य केले आहे. ते म्हणाले, “आम्हाला इराणकडे अण्वस्त्र नको आहेत, अगदी त्याच्या जवळपासही त्यांनी पोहोचू नये ही आमची अट आहे. तसेच त्यांच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर मर्यादा आणि मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करणे हे आमचे लक्ष्य आहे.” इराणकडे असलेले युरेनियम करार झाल्यास अमेरिका स्वतः ताब्यात घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. हेही वाचा – आसाममध्ये कोणाचं सरकार येणार? ओपिनियन पोलमध्ये समोर आली ‘ही’ माहिती कोणासोबत सुरू आहे चर्चा? ही चर्चा नेमकी कोणासोबत सुरू आहे, या प्रश्नावर ट्रम्प यांनी थेट नाव घेतले नाही, परंतु त्यांनी इराणमधील एका ‘शक्तिशाली’ नेत्याचा उल्लेख केला. दरम्यान, ‘जेरुसलेम पोस्ट’च्या एका रिपोर्टनुसार, इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद-बाघेर घालिबाफ हे इराणच्या वतीने या चर्चेचे नेतृत्व करत असल्याचे समजते. ट्रम्प यांनी असेही सूचित केले की, स्टीव्ह वायकॉफ आणि जेरेड कुशनर हे अमेरिकेच्या वतीने चर्चेत सक्रिय आहेत. इराणचा नकार आणि संभ्रम – एकीकडे ट्रम्प चर्चेचा दावा करत असताना, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि तेथील सरकारी माध्यमांनी अशा कोणत्याही चर्चेचे वृत्त फेटाळून लावले आहे. इराणच्या या नकारावर प्रतिक्रिया देताना ट्रम्प म्हणाले की, “ते कशाचा नकार देत आहेत हे मला माहित नाही, पण काल रात्री सुद्धा दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली आहे.” दरम्यान, अमेरिका आणि इराणमधील हे ‘माईंड गेम’ सध्या जागतिक राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहेत. जर हा करार यशस्वी झाला, तर पश्चिम आशियातील युद्धाचे ढग विरघळण्यास मोठी मदत होऊ शकते.