जो मोजेल दाम त्याचेच होईल काम

माण तालुक्‍यातील प्रकार; पुरवठा विभागात सावळा गोंधळ
म्हसवड (प्रतिनिधी) – माण तालुक्‍यातील पुरवठा विभागाच्या कार्यालयात सर्वसामान्य जनतेच्या कामाचा पुरता बोजवारा उडाला आहे. पुरवठा विभागात सुरु असलेल्या सावळा गोंधळाचा सामान्यांना फटका बसत आहे. अनेकांची किरकोळ कामेही रखडवली जात आहेत. विशेष म्हणजे “जो मोजेल दाम त्याचेच होतेयं इथे काम’ असा प्रकार सध्या या विभागात सुरु आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरुन या प्रकाराची दखल घेऊन सामान्य जनतेची नाहक होणाऱ्या त्रासातुन सुटका करावी, अशी मागणी होत आहे.

कोणत्याही शासकीय कार्यालयात खेटे मारल्याशिवाय सामान्य जनतेचे कोणतेच काम होत नाही ही वस्तुस्थिती असल्यानेच कदाचित “सरकारी काम अन सहा महिने थांब’ ही म्हण प्रचलित झाली असावी. सामान्यांना किरकोळ कामासाठी वारंवार हेलपाटे मारुनही त्यांची संबंधित कार्यालयातून कामे मार्गी लागतील याची शाश्‍वती नाही, या उलट किरकोळ कामासाठी ज्याची दाम मोजायची तयारी असते त्यांची कामे अगदी सहजपणे होताना दिसतात.
कामासाठी दाम मोजणाऱ्या दामुअण्णांसाठी संबंबिधत कार्यालयाचे दरवाजे कायम उघडे असतात तर दाम न मोजता नुसते हेलपाटे मारणाऱ्या सामान्यांच्या पदरी फक्त हेलपाटेच येतात. असाच प्रत्यय सध्या माण तालुक्‍याच्या पुरवठा विभागातून सामान्यांना येवू लागला आहे.

खरेतर सर्वसामान्य जनतेसाठी सर्वात महत्वाचा पुरावा अथवा दाखला कोणता असेल तर तो रेशनिंग कार्डचा. या कार्डाशिवाय सामान्यांचे कोठे काही चालत नाही. अशी कार्डे देण्याचे काम या पुरवठा कार्यालयातून चालत असते. यासाठी सामान्य जनता याठिकाणी येत असते, मात्र त्यांचे एका हेलपाट्यात काम झाले आहे असे आजवर कधी झालेच नाही. साहेब नाहीत, मिटींगला गेलेत, पुढच्या अठवड्यात या, कागदपत्रे अपुरी आहेत, कोणती कागदपत्रे कमी आहेत ती नंतर सांगतो, सही करण्यासाठी ठेवलीत, कागदपत्रे सापडत नाहीत अशी उत्तरे नेहमीच सर्वसामान्यांना पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांकडुन ऐकवली जातात. मात्र एखादा दामुअण्णा आला की लगेच त्यांच्यासाठी चहाची ऑर्डर दिली जाते. ही येथील वस्तुस्थिती असून सामान्य जनतेचे सुरु असलेले अर्थिक शोषण कधी थांबणार असा सवाल कामानिमीत्त येथे येणाऱ्या प्रत्येकाकडून विचारला जात आहे.

कार्यालयाला एजंटाचा विळखा
सदर ठिकाणी गेल्यावर आपले काम झटपट करुन देतो असे सांगुन थेट साहेबासमोर संबंधितांना उभे करणारी टोळीच येथे कार्यरत आहे. त्या टोळीकडे सर्व बाबींची पुर्तता झाल्यास तात्काळ कामे पुर्ण झाल्याचा अनुभव अनेकांना येतो. त्यामुळे हे कार्यालय एजंटाच्याच विळख्यात असल्याचे स्पष्ट होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.