कोर्टात जे होईल ते होईल; दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : दिशा सालियनची सामूहिक बलात्कार करून निघृण हत्या केल्याचा आरोप करत एनआयएमार्फत चौकशीचे आदेश द्या, अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल केली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे, अभिनेता सूरज पांचोली, दिनो मोरीयो यांच्यासह मुंबई पोलिसांवर या याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले आहेत.सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू झाला त्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात 44 वेळा फोनवर काय बोलणे झाले? असा सवाल याचिकेतून विचारण्यात आला आहे. यावर आता आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरे म्हणाले, मागील पाच वर्षापासून मला त्रास देण्याचे सतत चालू आहे. कोर्टात जे होईल ते होईल. मी एकच सांगेल, पाच वर्षे बदनामीचा प्रयत्न झाला आहे. कोर्टात उत्तर देऊ, असे ठाकरेंनी स्पष्ट केले. कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर ठाकरेंची ही पहिलीच प्रतिक्रिया आहे. ठाकरेंनी राज्यपालांची भेट घेऊन आल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे म्हणाले, आज आम्ही राज्यापालांची भेट घेतली. काल वेळ मागितली होती. दोन तीन विषय त्यांच्यासमोर मांडली आहे. रिमुव्हल मोशनवरून आम्ही त्यांच्याकडे न्याय मागितला. ट्रस्ट ऑफ मोशन एका मिनिटात आणली. पॉइंट ऑफ प्रोसिजरमधून आणली. सर्व काही गडबड झाली नाही. असे हाऊस कधीच चालत नव्हते. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचा अपमान सरकार आणि खुर्चीवर बसलेले लोक करत आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
कधी अबू आजमी असेल कधी औरंजेब असेल त्यावरून सत्ताधारीच पक्ष हाऊस बंद पाडत आहे. त्यांच्याकडे अजेंडा नाहीये. आम्ही प्रश्न उत्तराचा तास असेल, लक्ष्यवेधी असेल मंत्री बसत नाही, अधिकारी असत नाही. त्यावर चर्चा झाली पाहिजे. आम्ही राज्यपालांना विनंती केली की सरकारमधील प्रतिनिधींना बोलावून घ्यावं आणि समज द्यावी. त्यांनी मुख्यमंत्र्यांना बोलवून घ्यावे. मुख्यमंत्र्यांनी सर्व कॅबिनेट मंत्र्यांना समज द्यावी. स्वतची स्वत उत्तरे द्यावी. अभ्यासपूर्वक द्यावी, अभ्यास करून द्यावी. आणि विधानसभा सुरू असताना मंत्र्यांनी अधिकाऱ्यांनी हाऊसमध्ये हजर राहावे.
काल नाना पटोले बोलायलं उभे राहिले. तेव्हा एकच मंत्री तिसऱ्या रांगेत होता. अदृश्य गॅलरीत सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी कोणीच नव्हते. पीएही नव्हते. विरोधी पक्ष म्हणून नाही तर जनतेतून निवडून आलेले आमदार म्हणून आलो आहोत. काल सत्ताधारी आमदारही आमच्या सूरात सूर मिसळून त्यांनीही हाऊस बंद पाडून घेतले. त्यांनाही चर्चा हवी आहे, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले.
आदित्य ठाकरेंना अटक करुन चौकशी करा; सत्ताधाऱ्यांची मागणी
भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार अशाप्रकरणात ज्या संबंधित व्यक्तीवर आरोप होतो, त्याला तात्काळ अटक करुन त्याची चौकशी करावी लागते. काल सतीश सालियन यांनी मविआच्या काळातील मंत्र्यावर आरोप केले. त्यामुळे त्या नेत्याला सामान्य व्यक्तीप्रमाणे न्याय लावावा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली. नितेश राणे यांच्या या मागणीला शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी समर्थन दिले. नितेश राणे म्हणता त्याप्रकारे सामान्य माणसाला जो न्याय लागतो, तोच नियम माजी मंत्र्याला लावला पाहिजे. त्यामुळे मंत्रिमहोदयांनी आरोपीला तात्काळ अटक करुन चौकशी करावी, असे शंभुराज देसाई यांनी म्हटले.




