‘Chandrayaan 3’ यशस्वी लँडिंगनंतर चंद्रावर काय-काय करणार? वाचा सविस्तर बातमी…..

श्रीहरीकोटा – भारतासोबत संपूर्ण जगाच्या नजरा इस्रोच्या ‘चांद्रयान-3’ या मोहिमेकडे लागल्या आहेत. जिथे चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी संपूर्ण देश प्रार्थना करत आहे. संपूर्ण आज देश खूप उत्साहित आहे. चांद्रयान-3 यशस्वीपणे उतरवून इस्रोने इतिहास रचावा, अशी देशवासियांची इच्छा आहे.
सध्या भारताचे चांद्रयान लँडर चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालं असून त्यासाठी वातावरण पोषक असल्याची माहिती इस्त्रोने दिली आहे. आता इस्रो कडून लँडरला अंतिम कमांड देण्यात आली आहे. चांद्रयान-3 आजच लँडिंग होणार हे स्पष्ट आहे. दरम्यान, चांद्रयान-3 लँडर चंद्रावर उतरल्यानंतर कोणता अभ्यास करणार याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिली आहे….
चांद्रयान-3 कोणता अभ्यास करणार :
– चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मातीचा अभ्यास करणार
– पृथ्वी, सूर्यमाला, चंद्राच्या निर्मितीची अनेक रहस्ये शोधणार
– चंद्रावर सिलिकॉन लोह, टायटेनियमसारखी दुर्मीळ खनिजं शोधणार
– अब्जावधी वर्ष अंधार, प्रचंड थंडीतल्या मातीत बर्फाचे रेणू शोधणार
– बर्फ, पाण्याचा अंश सापडल्यास भविष्यातील मोहिमांना फायदा
– पाणी असल्यास चंद्रावर ऑक्सिजन, हायड्रोजनची निर्मिती शक्य
– ऑक्सिजन निर्मितीनंतर चंद्रावर मानवी वस्तीचे स्वप्न दृष्टिपथात
चांद्रयान-3 मोहिम कशी आहे?
चांद्रयान-3 हे चांद्रयान-2 चे फॉलो-ऑन मिशन म्हणजे पुढील टप्पा आहे. चांद्रयान-3 मध्ये लॅंडर आणि रोव्हर पाठवण्यात आला आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लॅंडिंग करेल. त्यानंतर विक्रम लॅंडरमधील रोव्हर तेथील पाण्याचे साठे शोधणे आणि चंद्रावरील माती आणि दगड यांची नमुने आणि इतर आवश्यक माहिती गोळा करेल. चांद्रयान 3 च्या लॅंडरचे नाव “विक्रम’ आणि रोव्हरचे नाव “प्रज्ञान’ आहे.
चांद्रयान-3 मोहिमेचे टप्पे :
– चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅण्डिंग
– यान रोव्हर लॅण्डरपासून वेगळे होणार
– रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर चालणार
– पृष्ठभागावरच्या अनेक गोष्टींची माहिती संकलन
– काढलेले फोटो इस्रोच्या केंद्राकडे पाठवणे





