रायगड : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात पेटला आहे. रायगडच्या पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर नाराजीनाट्य सुरू झालं. मंत्री भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रिपद न मिळाल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज होते. यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली. मात्र पूर्वी ज्यांच्या नावाची घोषणा पालकमंत्री म्हणून झाली आहे, तेच प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करतील असं ठरलं होतं. त्यामुळे आज आदिती तटकरे यांनी झेंडावंदन केलं. यावर बोलताना भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनीत तटकरे यांच्यावर निशाणा साधला. काय म्हणाले भरतशेठ गोगावले? जो भावाचा नाही झाला तो आमचा काय होणार, आव्हान स्किकारून चालतो तोच यशस्वी होतो. मंगळवारी आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, काही गोष्टी या गनिमी काव्याच्या असतात, असे गोगावले म्हणाले. महाविकास आघाडीच्या काळात आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री या आदिती तटकरे होत्या, त्यांना वैतागून आम्ही रायगड जिल्ह्यातल्या तीन आमदारांनी उठाव केला, आणि त्यानंतर गुवाहाटीचं लोण संपूर्ण राज्यात पसरलं. त्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झालं असे भरतशेठ गोगावले म्हणाले.