Sunil Tatkare Vs Rohit Pawar : सल्ला देण्याचा त्यांना अधिकार काय? सुनिल तटकरे आणि रोहित पवार यांच्यात शीतयुद्ध
रोहित पवार यांनी सातत्याने सुनील तटकरे यांच्यावर टीका केली असून, तटकरेंनीही या टीकेला प्रत्त्युतर दिले आहे.

Sunil Tatkare Vs Rohit Pawar – राष्ट्रवादी काँग्रेस(शप)चे आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातील शीतयुद्ध आता उघड झाले आहे. रोहित पवार यांनी सातत्याने सुनील तटकरे यांच्यावर टीका केली असून, तटकरेंनीही या टीकेला प्रत्त्युतर दिले आहे. अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड झाल्यानंतर आज बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सुनील तटकरेंनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली.
तटकरे म्हणाले, आजची बैठक अनिकेत यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांसाठी होती. विरोधकांच्या मनावर खूप परिणाम झालेला आहे. त्यामुळे ते घोडेबाजार झाल्याची टीका करतात. निदान विजय झाल्यानंतर तरी आमचे अभिनंदन करायला तरी शिका, अशा शब्दांत तटकरे यांनी खासदार संजय राऊत आणि रोहित पवारांवर टीका केली आहे.
रोहित पवारांनी माझ्या घराण्यावर बोलू नये. पवार घराणे हे देशात, महाराष्ट्रात महत्त्वाची भूमिका बजावणारे घराणे आहे. मात्र, त्यांची पुढील पिढी कोणत्या पद्धतीने बोलते हा त्यांचा भाग असणार आहे. रायगडमधील जनतेने मला निर्वाचित केले आहे, असे म्हणत त्यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला.
तुमचे जे सहकारी आहे ते टिकवा, कारण तुम्हीच एकेकाळी हडपसरमधून भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी कोणाला घेऊन वर्षा बंगल्यावर उंबरठे झिजवत होतात याची सगळी माहिती माझ्याकडे आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर कर्जत-जामखेडमधून राजीनामा देऊन पुन्हा भाजपकडून उभे राहण्यासाठी कोणाकोणाकडे कोणाच्या मार्फत गेला याची माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे, उगीच मलाच राजकारण कळते असा आव आणू नका, असे म्हणत तटकरेंनी पवार यांना फटकारले.





