काय मटण.. काय चिकन.. काय रस्सा..ओक्केमधेच हाय..

सुरेश डुबल
कराड – येथील पालिका निवडणूक जाहीर झाली अन् निवडणुकीची वाट बघून थकलेले भावी नगरसेवक राजकीय आखाड्यात आले. मात्र, जाहीर झालेली निवडणूक स्थगित झाल्याने भावींची पुन्हा निराशा झाली. असे असले तरी, निवडणूक ही यंदाच होणार यात शंका नाही. त्यामुळे मतदारांना खुश करण्यासाठी आखाडीच्या पार्ट्यांचा धुरळा आता उडू लागला आहे. शुक्रवारपासून शहरातील प्रत्येक वार्डात कोपरा सभा घेतल्याप्रमाणे इच्छूकांच्या आखाडीच्या पार्ट्या सुरू झाल्यात. त्यामुळे “काय मटण.. काय चिकन… काय रस्सा.. ओक्केमधेच हाय’ असे म्हणत मतदार ताव मारताना दिसत आहेत.
कोरोना कालखंडामुळे रखडलेल्या पालिकांच्या निवडणुकीचे वेध इच्छूकांसह मतदारांना लागले होते. अशातच अचानक निवडणूकीचे बिगुल वाजले. त्यानुसार 18 जुलैला कराड पालिकेसाठी प्रत्यक्ष मतदान, तर अर्ज भरण्याची सुरुवात 22 जुलैपासून सुरू होणार होती. त्यामुळे आठ महिन्यांपासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुकांनी बाह्या सरसावल्या आणि निवडणूक रिंगणात उडी टाकली. त्यांच्याकडून अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची जुळवा जुळवा सुरू झाली.
कधी एकदा 22 जुलै उजाडतोय, अन् मी अर्ज भरतोय.. अशा गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या काही इच्छुकांसह कसलेल्या नगरसेवक तयारीतच होते. मात्र त्याच्या चार दिवस आधीच राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम स्थगित केला त्यामुळे पुन्हा एकदा या इच्छुकांचा हिरमोड झाला.
तस पहायला गेल तर आखाड महीना प्रत्येक वर्षी येत असतो, मात्र दर पाच वर्षातून येणारा आषाढ महीना हा राजकीय व्यक्तींसह कराकरांसाठी महत्त्वाचा असतो, विशेष चर्चेचा असतो. यंदाचा आषाढ महीना हा निवडणूक वर्षातला असल्याने याला राजकीय महत्व आहे. मतदारांना लुभावण्यासाठी भावी नगरसेवकांकडून आखाडीचा बेत आखला आहे.
निवडणूकीची तारीख पुढील ढकलली गेली असली तरी निवडणुक या एक – दोन महिन्यात होणार हे निश्चित असल्याने यंदाच्या आखाडींच्या पंगतींना बहर येउ लागला आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमा संपल्यानंतर ते अमावस्यापर्यंत या आखाडीचा डाव सुरू असणार आहे. शुक्रवारपासून या आखाडीच्या पंगती उठू लागल्या आहेत.
मतदारांसाठी काय पण हे लक्षात घेउन त्याला मटण, चिकण, मासे यांची मेजवाणी सुरु आहेत. इमारतीचे पार्कींग, टेरिस, आडोशाला असलेल्या पत्र्यांची शेड, शेतातील वस्ती या ठीकाणी होत असलेल्या आखाडींची चर्चा असून आज कोणाच हाय र.. हे कार्यकर्ते विचारुन आपल्या नेत्यांच्या आखाडीची तारीख निश्चीत करताना दिसत आहेत. गुरपौर्णीमेनतर शहरातील प्रत्येक प्रभागातील चौकात चौकातून आता रात्री आठ नंतर मटन, चिकन, मासे याचा घमघमाट येऊ लागला आहे. हे चित्र गटारीपर्यंत वाढत जाईल यात शंका नाही. मतदार मात्र दर पाच वर्षातून येणाऱ्या या अनोख्या आखाडीचा आनंद लुटताना दिसत आहेत.
काय तो “ब्रॅंड’
आखाडीच्या पंगती उठू लागल्या. पण रंगीत संगीत मतदारांना कोरडी आखाडी नको आहे. त्यांना जेवणाबरोबर मदीराही हवी आहे. या विषेश मतदारांचीही काळजी इच्छूकांना घ्यावी लागत आहे. निवडणूक होईपर्यंत यांचा लाड पुरवावेच लागत असून त्यांना नाराज न करता हवा तो ब्रॅन्ड सध्या तरी देण्यात येत आहे. मात्र या आखाड्या मतपेटीत खऱ्या उतरणार का ते निकालांती स्पष्ट होईल.





