Satej Patil : हसन मुश्रीफ यांच्यासोबत आता दोस्ती कुठली? सतेज पाटील आक्रमक; म्हणाले “कोल्हापूरकरांचा…”
Satej Patil : काँग्रेस नेते माजी मंत्री सतेज पाटील यांनी तीव्र आक्षेप नोंदवत मोठी घोषणा केली आहे.

Satej Patil : गोकुळमधील सत्तासंघर्षाने आता नाट्यमय वळण घेतलं आहे. राज्य सरकारने चार शासन नियुक्ती संचालकांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. या निर्णयावर काँग्रेस नेते माजी मंत्री सतेज पाटील यांनी तीव्र आक्षेप नोंदवत मोठी घोषणा केली आहे.
कोल्हापूरकरांचा अपमान सरकारने केला आहे. हा स्वाभिमानी कोल्हापूरच्या जनतेचा अपमान आहे. ९ तारखेला सकाळी दहा वाजता दसरा चौक येथून कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढणार असल्याचे सतेज पाटील यांनी जाहीर केले आहे.
कोल्हापूरकरांचा कौल नाकारण्याचे काम सरकार करत आहे. शेतकऱ्यांचे बहुमत सरकारने नाकारले आहे. शेतकऱ्यांच्या मॅन्डेटही सरकार नाकारत आहे. सत्ता मिळवण्यासाठीच कॅबिनेटमध्ये कायदा बनवण्यात आला. ज्यांना जनतेने नाकारले ते तज्ज्ञ कसे? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
गोकुळला अमूलच्या घशात घालण्याचा डाव आहे. राज्यातील लोकशाही व्यवस्था हाणून पाडण्याच काम सरकार करत आहे. हसन मुश्रीफ यांच्यासोबत आता दोस्ती कुठली? त्यांनी गद्दारी केली. तुम्ही बॅक डोअर एन्ट्री केली, असा आरोप सतेज पाटलांनी हसन मुश्रीफांवर केला.
गोकुळ अध्यक्ष निवडीत सरकारने जाहीर केलेल्या सदस्यांना भाग घेता येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याच निर्णयावर जोरदार आक्षेप घेतला जात आहे. एकंदरीत गोकुळ निवडणुकीनंतर अध्यक्ष निवडीचा तिढा कायम असल्याचे चित्र आहे.
निवडणुकीनंतर कोणाला किती जागा मिळाल्या?
गोकुळच्या निवडणुकीत माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडी पॅनेलला १३ जागा मिळाल्या. तर महायुतीला १२ जागा मिळाला. अध्यक्ष निवडीसाठी १४ जागा असाव्यात. त्या दोन्ही बाजूच्या पॅनेलकडे नाहीत. त्यामुळे अध्यक्ष निवडीचे प्रकरण तांत्रिक बाजूच्या कचाट्यात सापडले आहे. ४ शासकीय सदस्यांना अध्यक्ष निवडीत मतदानाचा अधिकार मिळाल्यास महायुतीचा विजयाचा मार्ग मोकळा होणार असल्याची चर्चा आहे.






