पुणे | इच्छा व्यक्त केली तर त्यात चुकले काय?

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – निवडणूक लढविण्यासाठी कार्यकत्याने लोकशाही मार्गाने इच्छा व्यक्त केली तर त्यात चुकले काय? आजपर्यंत शांत होतो.
मात्र, नुकत्याच निरीक्षकांच्या उपस्थित झालेल्या उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दबावाच्या कार्यपद्धतीचा अवलंब केल्याचा आरोप माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केला आहे.
एवढच नव्हे तर पाटील यांच्याकडून इच्छुकांना पक्षातून बहिष्कृत केल्याची वागणूक देत असल्याचा आरोप करत मी रडणारा नाही तर लढणारा आहे, असे सांगत पाटील यांना थेट आव्हानच दिले.
भारतीय जनता पार्टी (भाजप) पुणे यांच्या वतीने शहरातील सहा मतदारसंघातील उमेदवार निवडीसाठी निरीक्षकांच्या उपस्थितीत त्या-त्या मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली.
या सहाही जागांपैकी पाच जागांवर विद्यमान आमदारांनाच पसंती मिळाल्याने अन्य इच्छुकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
कोथरूड मतदार संघातून भाजमधूनच इच्छुक असलेले माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत या आमदार, राज्याचे मंत्री आणि पक्षातील वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर थेट हल्लाबोल केला. यावेळी अमलेश रत्नपारखी, लक्ष्मीकांत जयस्वाल उपस्थित होते.
कार्यकर्ता निडर असावा, चुकीचं काही होत असेल तर ते रोखठोक मांडणारा असावा. त्यामुळे माझे पक्षाबद्दल काही चुकीचे मत नाही. तर काही व्यक्तींबद्दल तक्रार आहे.
काल निरीक्षक आले होते. तेथे मोजक्याच पदाधिकाऱ्यांना निरोप पाठवण्यात आले की, अमोल बालवडकर आणि शाम देशपांडे यांची नाव घेवू नये. प्रथम क्रमांकाचे नाव चंद्रकांत पाटील असे घेण्याबाबत सांगण्यात आले.
या अधीही दिवंगत गिरीश बापट यांच्यावेळी पक्षातील अनेकांनी इच्छुक असल्याचे सांगितले. त्यांना त्यावेळी तशी वागणूक मिळाली नाही.
मग मलाच का? तुमच्यात एवढा अहंकार आला की भाजपची संस्कृतीच राहिली नाही, असे सांगत काही नेते आणि व्यक्तींमुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे. – अमोल बालवडकर, माजी नगरसेवक
पक्षाने खरा सर्वे जनतेतून करावा…
माझ्या कोथरूडमधील नेते खूप मोठे आहेत. त्यांच्याबाबत कोणत्या वरिष्ठांकडे जायचे हा प्रश्न असल्याने माध्यमातून मांडत आहे. गिरीश बापट साहेब असते तर हा प्रकार झाला नसता. वरिष्ठांकडेही याबाबत कळविले आहे.
मला भविष्याची चिंता नाही, आत्मसन्मान दुखावला जात असेल तर तो मांडला पाहिजे. राजकारणात जीवंत राहिले पाहिजे हे देवेंद्र फडणवीस यांचे वाक्य असून त्यासाठी काही करता येईल ते करणार. पक्षाने खरा सर्वे जनतेतून करावा. असेही बालवडकर यांनी सांगितले.




