चांद्रयान-3 चे काय आहे उद्दिष्ट आणि वैशिष्ट्ये?; वाचा सविस्तर

नवी दिल्ली : भारतासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण संपूर्ण देश पुन्हा एकदा इतिहासाचा साक्षीदार होण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि चांद्रयान ३ थोड्याच वेळाच श्रीहरीकोटा येथील तळावरून अवकाशात झेपावणार आहे.
दरम्यान, आज दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी हे यान अवकाशात झेपावणारे आहे. या चांद्रयानाविषयी माहिती देताना इस्रोच्या अधिकाऱ्यांच्या मते, चांद्रयान-3 मोहीम चांद्रयान-2 चा पुढचा टप्पा आहे, जो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि विविध चाचण्या घेईल. यात प्रोपल्शन मॉड्यूल, लॅंडर आणि रोव्हर असेल. अभियानाच्या यशस्वितेसाठी नवीन उपकरणे तयार करण्यात आली आहेत. अल्गोरिदम सुधारण्यात आले आहेत.
‘लँडर’वरील उपकरणे
रंभा एलपी: चंद्राच्या पृष्ठभागाजवळील प्लाझ्माची (आयन आणि इलेक्ट्रॉन) विविध वेळांमध्ये घनता तपासणे.
चास्ते : चंद्राच्या ध्रुवानजीकच्या प्रदेशाचे औष्मिक गुणधर्म तपासणे.
इल्सा : स्थानकाच्या भागातील भूकंपांच्या नोंदी घेऊन चंद्राच्या कवचाचा अंदाज बांधणे.
‘रोव्हर’वरील उपकरणे
१) एपीएक्सएस : चंद्राच्या पृष्ठभागाचे रासायनिक गुणधर्म तपासणे आणि खनिजांचा अभ्यास करणे.
२) लिब्स : चंद्राच्या पृष्ठभागावरील माती आणि दगडांमधील मूलद्रव्यांचा शोध घेणे
प्रोपल्जन मॉड्यूलवरील उपकरण
-शेप : चंद्राभोवतीच्या कक्षेतून निअर इन्फ्रारेड लहरींमध्ये पृथ्वीच्या नोंदी घेऊन बाह्यग्रहांच्या शोधासाठी मार्गदर्शक प्रणाली विकसित करणे.
दरम्यान, चांद्रयान-3 ची तीन प्रमुख उद्दिष्टे असतील. एक म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंगचे प्रदर्शन करणे . दुसरे म्हणजे चंद्रावरील रोव्हर ऑपरेशन्सचे प्रात्यक्षिक करणे आणि तिसरे उद्दिष्ट म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावर इन-सीटू वैज्ञानिक प्रयोग करणे.
चांद्रयान-3 चे काय आहे वैशिष्ट्ये?
चांद्रयान-3 लॅंडर अशा प्रकारे डिझाइन केले गेले आहे की ते चंद्रावर नियुक्त केलेल्या ठिकाणी सॉफ्ट-लॅंड करू शकते आणि रोव्हर तैनात करू शकते, ज्याचा उद्देश चंद्राच्या पृष्ठभागाचे इन-सीटू रासायनिक विश्लेषण करणे आहे. प्रोपल्शन मॉड्यूल लॅंडर मॉड्यूलला 100 किमीच्या अंतिम वर्तुळाकार कक्षेत नेईल. या कक्षेत पोहोचल्यानंतर, लॅंडर मॉड्यूल आणि प्रोपल्शन मॉड्यूल वेगळे होतील. मोहीम यशस्वी ठरल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत पहिला देश ठरेल. बहुतांश काळ अंधारात असणाऱ्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पाणी असून, त्याचे नेमके स्वरूप भारताच्या मोहिमेतून समजेल. सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळातील रहस्ये उलगडण्यासाठी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील नोंदींचा उपयोग होईल. चंद्रावर पुन्हा माणसाला पाठवण्यासाठी आखण्यात आलेल्या अमेरिकेच्या आर्टेमिस मिशनला चांद्रयान ३ कडून मिळालेल्या माहितीचा उपयोग होईल. ती मोहीमही चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरवण्यात येणार आहे.




