“इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध, हा कोणता विचार?”; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

Devendra Fadnavis on Hindi Language | नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शाळांमध्ये पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयावर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात हिंदी भाषा सक्तीची करण्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून, इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हा कोणता विचार आहे? अशी विचारणा केली आहे.
“महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य आहे, सर्वांनी ती शिकलीच पाहिजे. पण त्याच्यासोबत दुसरी एखादी भाषा शिकायची असेल तर ती भाषा शिकता येतो. हिंदी शिकविणे म्हणजे हिंदी लादणे नाही. मला तर आश्चर्य वाटतं की हिंदीला विरोध मग इंग्रजीला का नाही. इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हा कोणता विचार आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी मराठीला कोणी विरोध केला तर सहन करणार नाही हे देखील स्पष्ट केलं.
राज ठाकरेंविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार
राज ठाकरेंच्या भूमिकेला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध करत शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. “राज ठाकरेंनी शाळा, पुस्तकालयं कशी टार्गेट करावी सांगितलं आहे. हे विदारक आहे. एक भाषा अधिक शिकायला मिळत असताना स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्योत्तर काळात कोणताही राजकारणी कोणीही इतक्या तालिबानी पद्धतीने वागला नसेल. राज ठाकरेंचं वर्तन दु:खद आहे. राज ठाकरेंना कायदा कळतो की नाही हे उपस्थित करणारं आहे. राज ठाकरेंनी धोरण न वाचता राजकीय पोळी भाजण्यासाठी चालवलेला हा एक प्रयत्न आहे”, असाही दावा त्यांनी केला आहे.
“ज्याप्रकारे राज ठाकरे यांचे कार्यकर्ते, बेकायदा मंडळी एकत्रित होऊन सार्वजनिकपणे शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या अख्त्यारित, शासनाच्या निर्णयाचं दहन केलं आहे ते चुकीचं, बेकायदा आणि असंवैधानिक आहे. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी कायद्याचा भंग करत बॅनर लावले. भाषेवर आधारित लोकांना वर्गीकृत करणं, वाद निर्माण करणं हेतू आहे. हे जातीय तेढ निर्माण करण्याचंही कृत्य आहे. राज ठाकरेंवर एफआयआर दाखल केला पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली आहे. Devendra Fadnavis on Hindi Language |
हेही वाचा :
Pune Gramin : अत्याचार करून खून करणाऱ्याच्या घराला लावली आग; गावात तणावाचे वातावरण





