Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री फडणवीस यांचा संबंधच काय? राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर छगन भुजबळांनी उपस्थित केली शंका म्हणाले

Chhagan Bhujbal : ५ जुलै २०२५ हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाचा दिवस मानला जाणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे विजयी मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले होते. ठाकरे बंधूंचे मराठीच्या भाषेच्या मुद्यावर एकत्र येणे ही महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड मानली जात आहे.
२० वर्षांपासून दुरावलेल्या भावांची माय मराठीमुळे बंधू भेट झाली असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या भेटचा विषय चर्चेत आहे. अनेक सत्ताधारी आणि विरोधकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. राज्याचे अन्नपुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. त्यामागे मराठी भाषेचा विषय हे तात्कालीक कारण आहे. मात्र यामध्ये अनेकांना काही शंका देखील आहेत. असे छगन भुजबळ म्हणाले. शिवसेनेतून वेगळे झाले ते का वेगळे झाले? आणि ते कारण किंवा त्यातील समस्येचे निराकरण झाले का? हा खरा प्रश्न असल्याचे भुजबळ म्हणाले. त्याबाबत अद्याप काहीही स्पष्टता झालेले नाही. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले तरी आगामी राजकीय स्थितीचे काय? हे स्पष्ट झाले पाहिजे, असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.
ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यातून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांनी सरकारवर टीकेचा भडिमार केला. राज ठाकरे यांनी भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत एक विधान केले. जे बाळासाहेबांना जमलं नाही जे इतर कोणालाही जमलं नाही ते फडणवीसांना जमलं, असे राज ठाकरे म्हणाले. त्यांनी केलेल्या या विधानावर ठाकरे बंधू एकत्र येण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचा संबंधच काय आहे, असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला आहे.
राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले, त्या कारणावर ठाकरे बंधूंमध्ये आजही चर्चा झाली आहे काय त्याचा खुलासा झालेला नाही, असे देखील भुजबळ म्हणाले. ठाकरे कुटुंब एका व्यासपीठावर येत असेल तर त्याचे कोणालाही वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ते एकत्र आले असल्याचे भुजबळ म्हणाले.
हेही वाचा : “छत्रपती संभाजी महाराज यांनी १६ भाषा शिकल्या ते काय…”; संजय गायकवाड यांच्या विधानामुळे नवा वाद





