चोरांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी : चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ
शिक्रापूर – येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून होणाऱ्या वाहन चोऱ्या व घरफोड्या यांना नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. अनेक चोऱ्यांचे प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले असतानादेखील शिक्रापूर पोलिसांना चोरांना पकडण्यात अद्याप यश आलेले नसल्यामुळे शिक्रापूर पोलिसांचे चाललेय तरी काय? असा सवाल ग्रामस्थांना पडला आहे.
शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वाहन चोरांनी दहशत माजविली असून अनेक दिवसांपासून घरफोड्या व दुकानांच्या चोऱ्यांनी देखील उच्चांक गाठला आहे. अनेकदा चोरी करताना चोर सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले आहेत; मात्र सीसीटीव्हीमधील चोरांनी देखील त्यांना पकडण्याचे पोलिसांना आव्हान दिलेले आहे. त्यामुळे चोरांना पकडण्यात पोलीस अपयशी ठरलेले आहेत.
शिक्रापूर पोलीस स्टेशन कर्मचारी संख्या
पोलीस निरीक्षक 1, सहाय्यक पोलीस निरीक्षक 2, पोलीस उपनिरीक्षक 5, सहाय्यक पोलीस निरीक्षक 9, पोलीस हवालदार 15, पोलीस नाईक 13 तर पोलीस शिपाई व महिला पोलीस 25 आणि यांसह 15 होमगार्ड असा पोलीस कर्मचारी वर्ग शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहे.
दबंग अधिकाऱ्यांची आठवण
शिक्रापूर पोलीस ठाण्यात यापूर्वी असलेले पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी चोरांच्या टोळ्या, बनावट नोटांच्या टोळ्या, वाहनचोरांच्या टोळ्या, चंदन चोरांच्या टोळ्या पकडून जनतेमध्ये विश्वासार्हता निर्माण केली होती. त्यानंतर रमेश गलांडे यांनी काही प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण रोखले होते. संतोष गिरीगोसावी यांचा अनेकांनी धसका घेतला होता; परंतु काही दिवसांतच त्यांची बदली झाली त्यामुळे अशा दबंग अधिकाऱ्यांची आठवण होत आहे.